जयंतरावांच्या मेहुण्यांकडुन मिरज पूर्वमध्ये राजकीय मशागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:18+5:302021-09-15T04:31:18+5:30
सुशांत घोरपडे म्हैसाळ : मिरज पूर्व भाग नेहमीच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणारा भाग म्हणून परीचित. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत ...

जयंतरावांच्या मेहुण्यांकडुन मिरज पूर्वमध्ये राजकीय मशागत
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : मिरज पूर्व भाग नेहमीच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणारा भाग म्हणून परीचित. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मेहुणे, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर हे मिरज पूर्व भागांत करेक्ट कार्यक्रम करत सुटले असल्याने हा भाग राष्ट्रवादीमय झाला आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज पूर्व भागात माजी मंत्री मदन पाटील, प्रकाशबापू पाटील यांचे मोठे वजन होते. माजी पाटबंधारे मंत्री आजितराव घोरपडे यांचा गटही मोठ्या प्रमाणावर सक्रिय होता. राज्यात भाजपची सत्ता आली. त्यानंतर या सर्व गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते तटस्थ राहिले. प्रकाशबापू पाटील व मदन पाटील यांच्या निधनानंतर मात्र गावाेगावचे कार्यकर्ते पोरके झाले. काहींनी राज्यातील बदलाचे वारे पाहुन भाजपचे आमदार सुरेश खाडे यांचा हात पकडला. भाजपात प्रवेशही केला. काहींनी पडद्यामागून खाडेंना आमदारकीला मदत केली. पण राज्यात माेठ्या उलथापालथीनंतर सत्तांतर घडुन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. सांगलीच्या पालकमंत्रीपदी जयंत पाटील यांची वर्णी लागली. काँग्रेसचे युवा नेते विश्वजित कदम कृषी व सहकार खात्याचे राज्यमंत्री झाले. त्यामुळे पूर्वभागातील नेतेमंडळी पुन्हा स्वगृही परतू लागली आहेत. गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जयंत पाटील यांचे मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी मिरज पूर्व भागातील अनेक कार्यकर्तांचा पक्षप्रवेश घेत पक्ष बळकट करायला सुरूवात केली आहे. आता मिरज बाजार समितीचे अध्यक्ष वसंतराव गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधल्याने येणाऱ्या जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले दिवस येणार, असे चित्र आहे.