शीलवान, कर्तव्यदक्ष शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:22+5:302021-09-05T04:30:22+5:30

विशेष म्हणजे एस. के. होर्तीकर सर हे स्वतः शिक्षक आहेत आणि त्यांचा जन्मदिवससुद्धा ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनासारख्या पवित्रदिनी ...

Polite, dutiful teacher | शीलवान, कर्तव्यदक्ष शिक्षक

शीलवान, कर्तव्यदक्ष शिक्षक

विशेष म्हणजे एस. के. होर्तीकर सर हे स्वतः शिक्षक आहेत आणि त्यांचा जन्मदिवससुद्धा ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनासारख्या पवित्रदिनी आहे, हा खूप मोठा दुग्धशर्करा योग आहे. एस. के. होर्तीकर यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६४ रोजी जतसारख्या दुष्काळी आणि कायम मागासलेल्या उमदीसारख्या ठिकाणी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. जन्म जरी दुष्काळ व मागासलेल्या भागात झाला असला तरी त्यांचा जन्म ज्या कुटुंबात झाला होता, ते कुटुंब मात्र प्रागतिक विचारसरणीचे, संस्कारसंपन्न, श्रमजीवी व कर्मावरती अपरंपार विश्वास ठेवून प्रामाणिक कष्टाला आयुष्यात पर्याय नाही, या तत्त्वाला मानणारे आहे.

वडिलांचे नाव कॉम्रेड कल्लाप्पान्ना होर्तीकर. कॉम्रेड कल्लाप्पान्ना होर्तीकर हे त्याकाळी सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील प्रामाणिक भारदस्त व कडक शिस्तीचे व्यक्तिमत्त्व होते. जसे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे म्हटले जाते, त्याप्रमाणे श्रीशैल होर्तीकर सर यांची वैचारिक जडणघडण होती. वडील कल्लाप्पान्ना होर्तीकर, काका रामचंद्र होर्तीकर व मदगोंडा होर्तीकर यांच्यामुळे सरांचे व्यक्तिमत्त्व अतिशय उत्तम पद्धतीने घडत गेले.

आयुष्यामध्ये पैशापेक्षा महत्त्वाची संपत्ती म्हणजे स्वाभिमान आणि आपला आत्मसन्मान कधीही गहाण ठेवू नका, अशी कल्लाप्पांन्ना यांची शिकवण. कल्लाप्पान्ना हे श्रीशैल होर्तीकर सरांसाठी आणि उमदी गावासाठी वैचारिक समृद्धीने संपन्न असलेले विद्यापीठच. अशा कर्तृत्ववान कुटुंबात सरांचा जन्म झाल्यामुळे त्यांचा वैचारिक पाया खूप मजबूत बनला.

प्राचार्य एस. के. होर्तीकर सरांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उमदी येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर व कोल्हापूर या ठिकाणी झाले. शहरामध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करूनसुद्धा त्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. आजसुद्धा ते घरातले संस्कार विसरले नाहीत.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमदी येथे कल्लाप्पान्ना होर्तीकर यांनी उभारलेल्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता प्राथमिक आश्रमशाळा येथे ६ जुलै १९८७ रोजी शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांच्या कर्तृत्वामुळे १० जून १९९३ रोजी मुख्याध्यापक बनले. त्यानंतर १ मे २००१ रोजी महात्मा विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज उमदी येथे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले.

यापुढील त्यांचा प्रवास खूप महत्त्वाचा, कारण ज्यावेळी एस. के. होर्तीकर सर हे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले, त्यावेळी शाळेमध्ये व महाविद्यालयामध्ये कमालीची शिस्त त्यांनी निर्माण केली. त्यांची स्वतःची वागणूक अगदी शिस्तबद्ध व त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक असतो. शाळेला त्यांच्यामुळे एक कडक विचारसंपन्न, चारित्र्यसंपन्न आणि कमालीच्या शिस्तीचे प्राचार्य मिळाले. त्यांच्यामुळे शाळेमध्ये, शिक्षकांमध्ये व शाळेच्या वातावरणामध्ये एक नवचैतन्य संचारले व त्यांच्या काम करण्याच्या विशिष्ट शैलीमुळे व त्यांच्या स्पष्ट निर्णय घेण्याच्या वृत्तीमुळे दबाव झुगारून काम करणाऱ्या शैलीमुळे, कणखर नेतृत्व गुणामुळे आणि प्रागतिक दूरदृष्टी लाभलेली असल्यामुळे थोड्या दिवसांमध्ये शाळेने व संस्थेने शिक्षण, कला व क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर चांगले नाव कमावले.

जत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वोदय शिक्षण संस्थेचे नाव उज्ज्वल करण्यामध्ये माननीय प्राचार्य एस. के. होर्तीकर सर यांचे खूप मोठे योगदान आहे. सरांच्या कर्तृत्व नेतृत्व गुणामुळे सांगली जिल्ह्यामध्ये सर्वोदय शिक्षण संस्थेने आपली अमिट अशी छाप उमटवली आहे. सरांच्या दृष्टीमुळे संस्थेने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा संस्थेने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यासाठी शिक्षकांचे सरांना उत्तम सहकार्य व योगदान लाभलेले आहे. त्या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे एवढी मोठी कामगिरी संस्थेकडून घडू शकली. कारण सर्वांना सोबत घेऊन, सर्वांचा विश्वास संपादन करत संस्थेला यशाच्या व कीर्तीच्या शिखरावर घेऊन जाण्याचे काम माननीय प्राचार्य एस. के. होर्तीकर सर यांनी उत्तम पद्धतीने केले आहे. म्हणून सरांना पाहून एक सर्वोत्तम शिक्षक म्हणजेच शीलवान, क्षमाशील व कर्तव्यदक्ष अशा महान व्यक्तिमत्त्वांची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

प्राचार्य एस. के. होर्तीकर सर यांचे शैक्षणिक काम पाहून सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मराठी पत्रकार परिषदेकडून आदर्श शैक्षणिक सेवा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच बसवश्री पुरस्कार, उत्कृष्ट आयोजक पुरस्कार, जत लायन्स क्लबकडून आदर्श शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिवपद, वेल्फेअर असोसिएशन फाॅर दि डिसेबल्ड मिरजचे अध्यक्षपद, लायन्स क्लब उमदीचे संस्थापक व अध्यक्षपद, कन्नड अभिवृद्धी प्राधिकरण कर्नाटक राज्याचे सदस्यपद आदी पदावरील प्राचार्य एस. के. होर्तीकर सर हे जबाबदारी स्वीकारून आपल्या कामाची छाप पाडत आहेत.

प्राचार्य एस. के. होर्तीकर सर म्हणजे अखंड प्रेरणेचा स्रोत आहेत. युवा पिढीसाठी आपल्या कर्तृत्वाने त्यांनी प्रगतीचा व यशाचा नवीन मापदंड समाजासमोर निर्माण केला आहे. अशा शुभदिनी व त्यांच्या जन्मदिनी ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो व अशाच पद्धतीने समाजसेवा, शैक्षणिक सेवा, कौटुंबिक सेवा करण्यासाठी त्यांना बळ मिळो. ग्रामदैवत श्री वीर मलकारसिद्ध चरणी एकच प्रार्थना करतो, देव त्यांना उदंड आयुष्य देवो, पुन्हा एकदा जन्म दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...

जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवतात तुम्ही जेव्हा...

जेव्हा काय करावे काहीही समजत नाही, तेव्हा आठवणीत येता तुम्ही...

तुमच्यासारख्या गुरूंना मिळून खरोखरच धन्य झालो आम्ही....

शब्दांकन -

राहुल सिद्धाप्पा साबणी, माजी विद्यार्थी.

संकलन -

राहुल संकपाळ

Web Title: Polite, dutiful teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.