पोलिसांच्या ‘ऑपरेशन मु्स्कान’मुळे ३८ बालकांच्या चेहऱ्यावर हसू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST2021-07-12T04:17:15+5:302021-07-12T04:17:15+5:30
सांगली : घरातील कौटुंबिक कलहामुळे घरातून निघून गेलेल्या अथवा हरवलेल्या बालकांचा पुन्हा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिसांनी ...

पोलिसांच्या ‘ऑपरेशन मु्स्कान’मुळे ३८ बालकांच्या चेहऱ्यावर हसू!
सांगली : घरातील कौटुंबिक कलहामुळे घरातून निघून गेलेल्या अथवा हरवलेल्या बालकांचा पुन्हा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ या मोहिमेला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या या मोहिमेत शून्य ते १८ वयोगटातील १८ मुले तर २० मुली अशा ३८ जणांचा शोध घेण्यात पाेलिसांना यश आले असून, त्यांना सुखरुपपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अजाणत्या वयात पालकांकडून झालेली मानहानी जिव्हारी लावून घेत अनेक मुले घरातून बाहेर पडतात तर काहीवेळेस मुलांचे अपहरण करुन त्यांना चुकीच्या मार्गाला लावले जाते. यात मुलांकडून भीक मागण्याचे, हॉटेलमध्ये काम अथवा इतर कामांसाठीही त्यांचा वापर केला जातो. कोरोनामुळे सुरु असलेल्या निर्बंधांमुळे अडचणीत अजूनच भर पडली आहे. या कालावधीत घरातील ताण सहन न झाल्यानेही काही बालके घर सोडून पलायन करत आहेत. मात्र, घरातून बाहेर पडल्यानंतर खरे वास्तव समजत असले तरी परतीचे मार्ग बंद झाल्याने अनेकजण मिळेल ते काम करुन गुजराण करतात.
अशाचा बालकांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यासाठी पोलीस दलातर्फे दरवर्षी ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत महिनाभराच्या कालावधीत मुलांच्या अपहरण, पलायनाच्या नोंदी घेऊन त्यांच्या शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते.
क्षणिक रागामुळे घरातून बाहेर पडलेल्या मुलांना शोधून त्यांना पालकांच्या ताब्यात देताना अनेकवेळा पोलिसांची कसोटी लागते. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडूनही या बालकांचे विशेष समुपदेशन केले जाते. घरातून बाहेर पडल्यानंतर झालेले हाल व घरात आल्यानंतर मिळणारी वागणूक याबाबत त्यांना आश्वस्त करत प्रसंगी पालकांचेही समुपदेशन केले जाते. त्यामुळे भविष्यात अशी मुले पुन्हा पलायनाचा निर्णय घेत नाहीत.
चौकट
आमिषाला बळी ठरणाऱ्यांचे प्रमाण अधिक
पौगंडावस्थेत मोबाईलसह इतर वस्तूंच्या आकर्षणासाठी घरात हट्ट केल्यानंतर ती न मिळाल्यास अनेकजण थेट घरातून पलायन करतात. याशिवाय काही अल्पवयीन मुली लग्नाच्या अमिषाला अथवा आई-वडिलांच्या त्रासाला कंटाळूनही पलायन करतात. अशा मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ प्रभावी ठरत आहे.
कोट
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या सूचनेनुसार, जून महिन्यात ऑपरेशन मुस्कान माेहीम राबविण्यात आली. यात पलायन केलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या मुलांचे योग्य ते समुपदेशन करुन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येत असल्याने पुढील अडचणी कमी होण्यासही मदत होणार आहे.
- मायादेवी काळगावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक.
चौकट
‘ऑपरेशन मुस्कान’मध्ये सापडलेली मुलांची संख्या ३८
मुले १८
मुली २०