मिरजेतील क्रीडा स्पर्धांवर पोलिसांचा ‘वॉच’
By Admin | Updated: January 18, 2016 00:33 IST2016-01-18T00:01:35+5:302016-01-18T00:33:39+5:30
वारंवार हाणामाऱ्या : पोलीस परवानगीची सक्ती होणार, शिवाजी क्रीडांगणाचा बनला आखाडा

मिरजेतील क्रीडा स्पर्धांवर पोलिसांचा ‘वॉच’
सदानंद औंधे -- मिरज -मिरजेत होणाऱ्या क्रिकेट व फुटबॉल स्पर्धेत वारंवार हाणामाऱ्या होत असल्याने, शिवाजी क्रीडांगणाचा आखाडा बनला आहे. अशा वारंवार होणाऱ्या हाणामाऱ्या रोखण्यासाठी, सामन्याच्यावेळी पोलीस बंदोबस्त किंवा पोलिसांची परवानगी घेण्याची सक्ती करण्यात येणार आहे. खेळासाठी असुरक्षित ठरलेल्या या मैदानावर आता पोलिसांच्या उपस्थितीतच खेळ रंगण्याची चिन्हे आहेत. मिरजेतील शिवाजी क्रीडांगणावर फुटबॉल, क्रिकेटसह विविध क्रीडा स्पर्धा व सामने सुरू असतात. शहरात एकमेव क्रीडा मैदान असलेल्या शिवाजी क्रीडांगणावर खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात. मात्र गेल्या वर्षभरात क्रिकेट व फुटबॉल सामन्यांदरम्यान मैदानात व मैदानाबाहेर हाणामारी व पंचांना मारहाणीच्या घडणाऱ्या घटनांमुळे खिलाडूवृत्तीला गालबोट लागत आहे. अटीतटीच्या सामन्यात प्रेक्षक स्थानिक संघाला जोरदार प्रोत्साहन देतात. मात्र स्थानिक संघ पराभूत झाल्यानंतर बाहेरील संघास मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.
दोन आठवड्यापूर्वी फुटबॉल स्पर्धेत मुंबई संघ विजयी झाल्यामुळे मिरज संघाच्या समर्थकांनी पंचांना मैदानातच बेदम मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसही जमावाने धक्काबुक्की केली. मारहाणीमुळे पंचांनी स्पर्धेतील पुढील सामन्यांवर बहिष्काराचा पवित्रा घेतल्यानंतर, पंचांची माफी मागून प्रकरण मिटविण्यात आले होते. त्यानंतर अंतिम सामन्यातही प्रेक्षकांची हाणामारी झाल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमाव नियंत्रणात आणला होता.
यापूर्वीही फुटबॉल मैदानावर पंचांच्या निर्णयाविरूध्द खेळाडू व त्यांच्या समर्थकांत हाणामारीचे प्रकार होऊन पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिकेकडे मैदानाचे भाडे भरून स्पर्धा घेण्यात येतात. मात्र मैदानावर पोलीस बंदोबस्त नसल्याने किरकोळ कारणावरून प्रेक्षक व खेळाडूही परस्परांना भिडत आहेत. फुटबॉल सामन्यात तर प्रेक्षक फटाके, औट उडवत, ताशे वाजवत असल्याने तणाव निर्माण होऊन दोन गट परस्परांवर धावून जात आहेत. स्पर्धेदरम्यान पंचांना, खेळाडूंना मारहाण, तसेच प्रेक्षकांत हाणामाऱ्याचे प्रकार वारंवार होत असल्याने, शिवाजी क्रीडांगणाचा आखाडा झाला आहे.
शिवाजी क्रीडांगणावर सध्या क्रिकेट स्पर्धा सुरू असून आठवड्यापूर्वी एका क्रिकेट खेळाडूने मैदानाशेजारी असलेल्या बारमधील वेटरवर चाकूहल्ला केल्याची घटना घडली. आता क्रिकेट स्पर्धेचे मैदानावरील फलक फाडण्यात आल्याने गेले, दोन दिवस धुसफूस सुरू आहे. याबाबत गांधी चौक पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी मैदानावरील फलक फाडण्याच्या प्रकाराची पाहणी केली.
शिवाजी क्रीडांगणाचे रणांगण होऊ नये यासाठी, स्पर्धेसाठी मैदान देताना पोलीस परवानगीची अट घालण्याची सूचना महापालिकेस पोलिसांकडून देण्यात येणार आहे. हाणामाऱ्या होण्याची शक्यता असेल, अशा संवेदनशीलप्रसंगी पोलीस बंदोबस्तातच स्पर्धा घेण्याची सक्ती करण्याचा पोलिसांचा विचार सुरू आहे.
सुविधा नाहीत : सुरक्षेचा बोजवारा...
शहरात महापालिकेचे एकमेव मैदान असलेल्या शिवाजी क्रीडांगणावर दिवसभर गर्दी असते, तर रात्रीच्यावेळी अंधारात व्यसनी व मद्यपींचा वावर असतो. यापूर्वी मैदानावर रात्रीच्या अंधारात काही खुनाच्याही घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात या क्रीडांगणाचा तलाव होतो. मैदानावर खेळाडूंसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. फुटबॉल व क्रिकेटसाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होते.
पालिकेस योग्य त्या सूचना देण्यात येईल....
शिवाजी क्रीडांगणावर दि. २३ रोजी महिला क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे. महिला सामन्यांसाठी हे मैदान सुरक्षित नसल्याने, संबंधितांना पोलीस बंदोबस्तातच सामने घेण्याची सूचना देण्यात येईल. महापालिकेने फुटबॉल व क्रिकेट सामन्यांना मैदान देताना संबंधितांना पोलिसांची परवानगी किंवा बंदोबस्त घेण्याच्या सूचना देण्याबाबत महापालिकेस कळविण्यात येणार आहे, अशी माहिती गांधी चौक पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.