आत्महत्येच्या उद्देशाने घरातून गेलेल्या विद्यार्थ्यास पोलिसांनी वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:30+5:302021-03-30T04:17:30+5:30
मिरजेतील ब्राम्हणपुरीतील सुमारे १६ वर्षे वयाचा दहावीतील विद्यार्थी सोमवारी सकाळी घरातून निघून गेला. दहावी परीक्षेचे पेपर अवघड जात असल्याने ...

आत्महत्येच्या उद्देशाने घरातून गेलेल्या विद्यार्थ्यास पोलिसांनी वाचविले
मिरजेतील ब्राम्हणपुरीतील सुमारे १६ वर्षे वयाचा दहावीतील विद्यार्थी सोमवारी सकाळी घरातून निघून गेला. दहावी परीक्षेचे पेपर अवघड जात असल्याने हा मुलगा निराश होता. त्याने यूट्युबवर आत्महत्या कशी करावी याबाबत सर्च केल्याचे दिसून आल्याने पालक हवालदिल होते. त्यातच सोमवारी सकाळी हा मुलगा घरातून बेपत्ता झाल्याने पालकांनी पोलिसांत धाव घेतली. मुलाने जाताना मोबाईल सोबत घेतला होता. मात्र, कोणाचा फोन तो घेत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी मुलाच्या मोबाईल लोकेशनची माहिती घेतली. तो जयसिंगपूर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेमार्गाजवळ असल्याचे आढळले. जयसिंगपूर पोलिसांना याबाबत कळवून मिरज पोलिसांनीही तेथे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मुलगा तेथून निघून गेला होता. हातकणंगलेपर्यत पोलिसांनी शोध घेतल्यानंतर निमशिरगावजवळ तो सापडला. या मुलास पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मिरजेतून सायकलवरून विश्रामबाग व तेथून जयसिंगपूरपर्यंत गेलेल्या या मुलाचा शोध लागल्याने पोलिसांची धावपळ सार्थक ठरली.