दरीबडचीच्या खुनातील दोघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:19+5:302021-04-18T04:25:19+5:30
संख : दरीबडची (ता. जत) येथील धनाजी भागाप्पा टेंगले (वय १९) या युवकाच्या खून प्रकरणातील संशयित राजू बाळू लेंगरे ...

दरीबडचीच्या खुनातील दोघांना पोलीस कोठडी
संख : दरीबडची (ता. जत) येथील धनाजी भागाप्पा टेंगले (वय १९) या युवकाच्या खून प्रकरणातील संशयित
राजू बाळू लेंगरे (वय २१), आदिनाथ सिध्दू हाक्के (१८, दोघेही पांढरेवाडी, ता. जत) या दोन संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
धनाजी टेंगले याचे शेजारील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्या मुलीचे राजू लेंगरे याच्याशी लग्न करण्याची चर्चा सुरू होती. राजूला धनाजीशी असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती होती. यातूनच राजू व धनाजी यांच्यात धुसफूस सुरू होती. मुलीचा नाद सोड म्हणून राजूने धनाजीकडे तगादा लावला होता. तरीसुध्दा प्रेमसंबंध सुरू आहेत, असा संशय त्याला होता.
गुरुवारी सायंकाळी धनाजी दूध घालण्यासाठी गावात गेला होता. कुलाळवाडी-दरीबडची रस्त्यावर करे यांच्या शेताजवळ अगोदरच राजू व त्याचा मित्र आदिनाथ हाक्के दबा धरून बसले होते. धनाजी दूध घालून परत येत असताना रस्त्यात अडवून कळायच्या आत एकाने तोंड दाबून ठेवले, तर दुसऱ्याने डोके, कानावर दगडाने गंभीर वार केला. दगडाने ठेचून त्याचा खून केला. नंतर घरी येेऊन कपडे काढूून ठेेेवले. कोणाला न सांगता जेवण करून झोपी गेेेले.
रात्री साडेदहा वाजले तरी धनाजी घरी परतला नाही, म्हणून वडील व नातेवाईकांनी शोध घेतला असता, रस्त्यावर त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी दुधाची किटली, चप्पल पडली होती.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सहायक निरीक्षक महेश मोहिते, अमरभाई फकीर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
रातोरात वेगाने हालचाली करून संशयितांच्या घरावर छापा टाकून दहाजणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच संशयित राजू लेंगरे, आदिनाथ हाक्के या दोघांनी खुनाची कबुली दिली. दोघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.