कोरोना काळात पोलिसांची वसुली, दोन अधिकाऱ्यांसह एक कर्मचारी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:36+5:302021-09-02T04:55:36+5:30
शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले असतानाही लाचखोरीचे प्रकार मात्र कायम आहेत. यंदा ...

कोरोना काळात पोलिसांची वसुली, दोन अधिकाऱ्यांसह एक कर्मचारी जाळ्यात
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले असतानाही लाचखोरीचे प्रकार मात्र कायम आहेत. यंदा लाचलुचपत विभागाने २० जणांना रंगेहाथ पकडले आहे. पोलीस प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांसह एक कर्मचारी व एका पंटरवरही कारवाई केली आहे. लाच घेण्यात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.
लाचलुचपतच्या सांगली विभागाने केलेल्या कारवाईत अप्पर तहसीलदार, वन परिक्षेत्र अधिकारी, नगरभूमापन अधिकारी, लेखाधिकारी, उद्यान अधीक्षक यासारख्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत २० प्रकरणात ३० जणांना अटक करण्यात आली असून त्यात एक महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
चौकट
दोन हजारांपासून सव्वा दोन लाखांपर्यंत लाच
१. अप्पर तहसीलदार जाळ्यात
माती वाहतूक करणारे जप्त वाहन सोडण्यासाठी व कारवाई टाळण्यासाठी दोन लाख ३० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व माडग्याळचे तलाठी विशाल विष्णू उदगिरे या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. उदगिरे याला रंगेहाथ पकडले होते.
२. सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कारवाई
अटकेतील संशयितास सहकार्यासाठी आणि वाढीव पोलीस कोठडी न मागण्यासाठी एक लाखाची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पोपट झालटे, पोलीस शिपाई विवेक पांडुरंग यादव व त्यांचा पंटर अकीब फिरोज तांबोळी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
३.लेखापरीक्षकाला अटक
चार्टर्ड अकाैंटन्सी फर्मचे नाव पॅनलमधून न काढण्याच्या मोबदल्यात एक लाख पाच हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा विशेष लेखापरीक्षक रवींद्र बाळकृष्ण वाघ याला मध्यवर्ती शासकीय इमारतीत रंगेराथ पकडण्यात आले.
चौकट
लाच मागितली जात असेल तर येथे संपर्क साधावा
१.शासकीय, निमशासकीय विभागातील कामासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने रकमेची मागणी करणे चुकीचे आहे. तसेच नागरिकांनीही कोणाला लाच देऊ नये.
२. पुणे विभागात सर्वाधिक केसेस करण्यात सांगली विभाग नेहमीच प्रभावी ठरला आहे. त्यामुळे लाच मागितल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी केले आहे.
चौकट
या वर्षात झालेली कारवाई अशी
जानेवारी : २
फेब्रुवारी : ०
मार्च : ५
एप्रिल : १
मे : ३
जून : ३
जुलै : ३
ऑगस्ट : ३