तुंग बालिका खून प्रकरणाच्या उत्कृष्ट तपासाबद्दल पोलिसांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:41+5:302021-05-08T04:26:41+5:30
सांगली : तुंग (ता. मिरज) येथील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या घटनेचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल अधिकारी, ...

तुंग बालिका खून प्रकरणाच्या उत्कृष्ट तपासाबद्दल पोलिसांचा गौरव
सांगली : तुंग (ता. मिरज) येथील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या घटनेचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याहस्ते गौरवपत्र देण्यात आले.
तुंग (ता. मिरज) येथे अल्पवयीन मुलीस मोबाईलवर चित्रफीत दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने याचा तपास करत अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता.
विशेष न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला १२ वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली. या गुन्ह्यात १४ साक्षीदार तपासण्यात आले होते.
या गुन्ह्याच्या तपासाबद्दल उपअधीक्षक वीरकर यांच्यासह महेश आष्टेकर, सिकंदर तांबाेळी, जावेद मुजावर यांच्यासह न्यायालयीन कामकाज पाहणारे गणेश वाघ, रमा डांगे, वंदना पवार यांना प्रत्येकी १० हजार रुपये व प्रशंसा पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहा. निरीक्षक संजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.