कुरळप : वशी (ता. वाळवा) येथील अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या तस्करांवर कारवाई करावी, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी वशी ग्रामस्थांनी आज येथील तहसील कार्यालयावर धडक मारली. दिवसभर ठिय्या देऊनही एकही सक्षम अधिकारी ग्रामस्थांसमोर आला नाही. त्यामुळे पोलिसांनी अडवले अन् प्रशासनाने झिडकारल्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आल्या पावली परतले.वशी येथे ग्रामतलावातील अवैध मुरुम उत्खननाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुनील व स्वप्निल पाटील यांचे दि. २५ पासून उपोषण सुरु आहे. काल पाचवा दिवस असूनही कोणताही शासकीय अधिकारी अथवा भागातील लोकप्रतिनिधी यांनी आंदोलनास भेट दिली नाही अथवा विचारणा केली नाही. यामुळे गावातील ग्रामस्थ व महिलांनी सायंकाळी बैठक घेऊन शुक्रवार दि. ३0 रोजी गाव बंद ठेवून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते.ठरल्याप्रमाणे वशी गाव कडकडीत बंद ठेवून शुक्रवारी ११ वाजता मोर्चा तहसील कार्यालयात आला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून दारातच थांबवले. यावेळी १५0 महिला व २00 पुरुष उपस्थित होते. तहसीलदार, प्रांत परगावी गेल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना थांबवून ठेवले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क सुरु आहे असे सांगून तासन् तास वेळ काढला. अखेर ३ च्या सुमारास महिला व पुरुष संतापले आणि प्रांत कार्यालयात घुसले. यावेळी प्रशासनाची तारांबळ उडाली. यानंतर पोलिसांनी जादा पोलिसांची कुमक मागवली. पोलीस आल्यानंतर ग्रामस्थांनी प्रांत कार्यालयाच्या व्हरांड्यात ठिय्या मारला. यानंतर ग्रामस्थांना पोलिसांनी खाली जाण्यास भाग पाडले. (वार्ताहर)
वशीच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडविले; प्रशासनाने झिडकारले..!
By admin | Updated: January 30, 2015 23:37 IST