विट्यातील पोलीस दीर्घ आजारी रजेवर
By Admin | Updated: July 1, 2014 00:39 IST2014-07-01T00:36:40+5:302014-07-01T00:39:54+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्रास : काही कर्मचाऱ्यांनाच झुकते माप

विट्यातील पोलीस दीर्घ आजारी रजेवर
दिलीप मोहिते ल्ल विटा
देव पाण्यात ठेवून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुवर्णनगरी विट्याचे पोलीस ठाणे पदरात पाडून घेतले. मात्र, आता सध्या येथील अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक आजारी (सीक) रजेवर जाणे पसंत करून पोलीस ठाणे सोडले आहे. दहा दिवसांपासून पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह १२ ते १३ पोलिसांनी आजारी रजा टाकून घर गाठले आहे. त्यातील पाच ते सहा कर्मचारी आज, सोमवारी पोलीस ठाण्यात हजर झाले असले तरी, आजारी रजेवर जाण्यामागे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा त्रास कारणीभूत असल्याची चर्चा आहे. पोलिसांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
विटा पोलीस ठाण्यात १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४ उपनिरीक्षक, ७ सहाय्यक पोलीस फौजदार, २१ पोलीस नाईक, १५ हवालदार, १९ शिपाई, ५ महिला पोलीस शिपाई, अशी एकूण ७४ कर्मचारीसंख्या आहे. त्यातील ६ पोलिसांची खानापूर औटपोस्टला नेमणूक आहे. सध्या बाहेरच्या बंदोबस्तासाठी ११ पोलीस कर्मचारी रवाना झाले आहेत, तर आज सोमवारच्या माहितीनुसार १ सहायक पोलीस निरीक्षक व ५ पोलीस कर्मचारी आजारी रजेवर गेले आहेत.
विटा पोलीस ठाणे दुष्काळी खानापूर तालुक्यातील असले तरी, हेच ठाणे मिळावे यासाठी नवीन अधिकारी धावपळ करतात. जुन्या विटा शहराची लोकसंख्या गृहीत धरून त्यावेळी नेमून दिलेल्या पोलीसांची संख्या आजही तेवढीच आहे. त्यामुळे वाढत्या शहरासह तालुक्यातील बंदोबस्ताचा ताण उपलब्ध पोलिसांवर पडत आहे. कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही बगलबच्च्यांना हाताशी धरून अन्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रकार सुरू केल्याचे बोलले जाते. या त्रासाला कंटाळून पंधरा दिवसात ठाण्यातील एक अधिकारी व १२ ते १३ कर्मचाऱ्यांनी आजारी रजेवर जाणे पसंत केले.
त्याच त्या पोलिसांना तोच तो बंदोबस्त देणे, हृदयविकार व मधुमेहग्रस्त कर्मचाऱ्यांना बाहेरचा बंदोबस्त लावणे, सुट्टीच्या दिवशीही काम करून घेणे, पर्यायी सुट्टी न देणे आदी कारणांमुळे काही कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजारी रजेवर जाणे, हा सर्वात सोपा मार्ग असल्याचे मत पोलीस खासगीत व्यक्त करतात. जाणूनबुजून आजारी रजेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या त्रासाचे नेमके कारण पोलीस अधीक्षकांनीच शोधावे, अशी मागणी होऊ लागली आहे.