मारेकऱ्यांपुढे पोलिसांनी टेकले गुडघे!
By Admin | Updated: June 8, 2015 00:50 IST2015-06-07T23:39:04+5:302015-06-08T00:50:23+5:30
पावसकर खून : आठ महिने पूर्ण; सूत्रधारही मोकाटच

मारेकऱ्यांपुढे पोलिसांनी टेकले गुडघे!
सांगली : माधवनगर रस्त्यावरील शशिकांत पावसकर या तरुणाचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांपुढे सांगली शहर पोलिसांनी गुडघे टेकले असल्याचे चित्र आहे. खून होऊन आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला, तरी याचा छडा लावता आलेला नाही. खुनाचा सूत्रधार कोण? हे माहीत असूनही केवळ त्याच्याविरुद्ध पुरावा नसल्याचे सांगून प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सूत्रधार मोकाटच आहे.शशिकांत पावसकर या १९ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह कृष्णा नदीत सापडला होता. त्याचे हात-पाय बांधलेले होते. नाका-तोंडातून रक्तस्त्राव झाला होता. घरातून त्याला बोलावून नेऊन, त्याचा दुसऱ्या ठिकाणी खून करुन त्याला नदीत फेकून देण्यात आले होते. आतापर्यंत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पण कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या अन्य भानगडी जोरात सुरु असतात. परंतु त्यांना हा गुन्हा उघडकीस आणण्यास मेहनत घेण्यास वेळ नाही. कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार तीन महिन्यापूर्वी सांगली शहर पोलिसांच्या दफ्तर तपासणीस आले होते. त्यावेळी त्यांनीही या खुनाचा गुन्हा का उघडकीस आला नाही? असा जाब विचारला होता. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे सोपविले होते. गायकवाड यांनीही गतीने तपास केला. पण त्यांनाही अपयश आल्याचे चित्र आहे.
पावसकरचा खून अनैतिक संबंधातून झाला आहे; तसेच मारेकरी कोण आहेत, हे आम्हाला माहिती आहे, असे पोलीस सांगत आहेत. मग मुळापर्यंत जाऊन का तपास केला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अत्यंत गुंतागुतीचे खुनाचे गुन्हे सांगली पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. मग हा गुन्हा का उघडकीस आणला जात नाही? तांत्रिक व जुन्या अशा दोन पद्धतीने आतापर्यंत तपास झालेला आहे. शहरातील काही गुन्हेगार व पावसकरच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र हाती काहीच लागले नाही. मारेकऱ्यांनी हा खून पचविला की काय? असे आता वाटू लागले आहे. पोलिसांनीही मारेकऱ्यांपुढे गुडघे टेकले असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)