पोलिसावर हल्ला करून चोरटा पसार पोलीस जखमी : साखराळेत पकडून नेताना प्रकार
By Admin | Updated: May 9, 2014 00:08 IST2014-05-09T00:08:12+5:302014-05-09T00:08:12+5:30
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील एका सराईत चोरट्याने त्याला पकडून नेणार्या पोलीस कर्मचार्यावर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली

पोलिसावर हल्ला करून चोरटा पसार पोलीस जखमी : साखराळेत पकडून नेताना प्रकार
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील एका सराईत चोरट्याने त्याला पकडून नेणार्या पोलीस कर्मचार्यावर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार आज (गुरुवार) दुपारी दीडच्या सुमारास राजारामबापू कारखाना कामगारांच्या कॉलनीजवळ घडला. यातील हल्लेखोर फरारी झाला आहे. शाम जोसेफ पांढरे असे जखमी पोलिसाचे नाव आहे, तर विवेक विलास कदम हा हल्लेखोर आहे. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणून कर्तव्यावर असताना मारहाण करून जखमी केल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी, विवेक कदम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरटा आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. तो फरारी होता. आज दुपारी शाम पांढरे हे पोलीस शिपाई दिलीप महाले यांना सोबतीला घेऊन विवेक कदम याला ताब्यात घेण्यासाठी साखराळेमधील त्याच्या घरी गेले. पांढरे व महाले यांनी त्याला ताब्यात घेतले. तेथून रिक्षा (एमडब्ल्यूई ४0९९) मधून विवेक कदम याला इस्लामपूर पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना कारखाना कॉलनीजवळ कदम याने पांढरे यांचे डोके रिक्षातील लोखंडी भागावर आपटले. त्यानंतर त्यांना चालत्या रिक्षातून खाली ढकलून दिले. तेथे पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्याला प्रतिकार करणार्या महाले यांनाही त्याने जुमानले नाही. या घटनेत रिक्षाचीही काच फुटून नुकसान झाले. हा प्रकार घडल्यानंतर कदम याने तेथून पोबारा केला. पांढरे यांच्या डोक्यास, हातास जखमा झाल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. (वार्ताहर)