पोलीस, गुंडांच्या जीवावर महाआघाडीचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST2021-08-28T04:30:31+5:302021-08-28T04:30:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पोलीस व गुंडांच्या जीवावर राज्यातील महाआघाडीच्या सरकारचा कारभार सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे ...

पोलीस, गुंडांच्या जीवावर महाआघाडीचा कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पोलीस व गुंडांच्या जीवावर राज्यातील महाआघाडीच्या सरकारचा कारभार सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून दडपशाही केली जात आहे. त्या विरोधात जिल्ह्यात वकिलांची फौज उभी करा. दडपशाहीला आक्रमक प्रत्युत्तर द्या, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांना दिले.
शहरातील विजयनगर येथे भाजप जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, निशिकांत पाटील, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पवार उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, सर्वच जिल्ह्यात भाजपने पक्ष कार्यालयासाठी जागा घेतली आहे. पक्षाचे कामकाज पक्ष कार्यालयातून चालावे, अशी नेत्यांची भूमिका आहे. हे कार्यालय आपुलकीचे केंद्र बनावे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या, प्रश्न कार्यालयातून सोडविले जावेत. राज्यातील ठाकरे सरकारने इतिहासात पहिल्यांदाच सर्वपक्षियांची बैठक घेतली आहे. ओबीसी आरक्षणावर भाजपने आवाज उठविल्याने सरकारला जाग आली. मराठा आरक्षण, महापूर, कोरोना यावर कधीच बैठक घेतली नाही. सरकार गुंड व पोलिसांच्या साहाय्याने सुरू आहे. अनिल देशमुख प्रकरणात शेवटी कागदपत्रे देण्याची तयारी दाखवावी लागली. सरकारचे चुकीचे सल्लागार कोण आहेत, हेच समजत नाही. कार्यकर्त्यांवर खटले दाखल होत आहेत. कार्यकर्त्यांच्या मागे वकिलांची फौज उभी करा. महाआघाडीतील तीनही पक्ष शेवटची फडफड करीत आहे.
पृथ्वीराज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डाॅ. रवींद्र आरळी, तमन्नगौडा रवी पाटील, राजाराम गरुड, नीता केळकर, भारती दिगडे, गौतम पवार, जयराज पाटील, सुरेश आवटी, युवराज बावडेकर, संगीता खोत, निरंजन आवटी उपस्थित होते.
चौकट
भाजपला कुबड्यांची गरज नाही : देशमुख
पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, पक्ष कार्यालयासाठी संग्रामसिंह देशमुख यांनी वास्तू उपलब्ध करून दिली. या कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार बसून लोकांचे प्रश्न सोडवतील. जिल्ह्यात भाजप भक्कम आहे. एखादा नेता पक्ष सोडून गेला तरी फारसा फरक पडणार नाही. येणाऱ्या सर्वच निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. कोणाच्या कुबड्यांची गरज नाही.