बलात्कारप्रकरणी येवलेवाडी येथील संशयितास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:41+5:302021-09-02T04:56:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या येवलेवाडी (ता. ...

बलात्कारप्रकरणी येवलेवाडी येथील संशयितास पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या येवलेवाडी (ता. वाळवा) येथील संशयिताच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दोन दिवसांपूर्वी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली हा गुन्हा दाखल झाला होता. येथील न्यायालयाने संशयितास चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.
राहुल राजाराम जगताप (वय २४, रा. येवलेवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव आहे. एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीत जगताप याने पीडित मुलीवर चार ते पाचवेळा बलात्कार केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो परागंदा झाला होता. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली.
राहुल जगताप याने पीडित मुलीच्या घरी ये-जा करण्यास मिळत असल्याच्या संधीचा गैरफायदा घेतला. त्याने पीडितेला माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे आमिष दाखवत तिच्याशी शरीरसंंबंध ठेवले. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिची खासगी रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यावेळी मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. राहुल जगताप याला अटक करून येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. यावेळी सरकार पक्षाने संशयित जगतापची वैद्यकीय तपासणी आणि डीएनए तपासणी करावयाची असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयाने राहुल जगताप याला ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करीत आहेत.