इस्लामपूर / कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे दहा हजारांची लाच घेताना अनिल किसन गुजर (वय ३४, मूळ रा. बिदाल, ता. माण, जि. सातारा, सध्या रा. पोलीस अधिकारी निवासस्थान, इस्लामपूर) आणि पोलीसनाईक शरद बापू जाधव (वय ४२, रा. चिंचोली, ता. शिराळा, सध्या रा. कासेगाव गर्ल्स होस्टेलजवळ) यांना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, सोमवारी पोलीस ठाण्यातच रंगेहात पकडले. काळमवाडी (ता. वाळवा) येथे दहा दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या प्रयत्नातील संशयितांना पुन्हा पोलीस कोठडी न मागण्यासह जामिनासाठी मदत करण्याकरिता या दोघांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ‘लाचलुचपत प्रतिबंधक’ची ही आठ महिन्यांतील जिल्ह्यातील विसावी, तर वाळवा पोलीस उपविभागातील चौथी कारवाई आहे. इस्लामपूरच्या पोलीस पाटलांशी पंगा घेतल्यानंतर गुजरची कासेगावला तात्पुरती बदली करण्यात आली असून, तेथे त्याला प्रभारी पदाचा कार्यभार दिला होता. काळमवाडी येथे दहा दिवसांपूर्वी दोन गटांत मारामारी झाली होती. त्यात दोन्ही गटांविरुद्धच्या संशयितांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला आहे. त्याचा तपास गुजर करीत होता. या गुन्ह्यातील एका गटाच्या संशयितांना अटक करून त्यांची गुजर याने दोन वेळा पोलीस कोठडी घेतली होती. पुन्हा पोलीस कोठडी न मागण्यासाठी संशयिताच्या मित्राकडे गुजर याने ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. गुजरने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी दहा हजार रुपये लगेच आणून देण्यास सांगितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.या विभागाने आज, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कासेगाव पोलीस ठाण्यातच सापळा लावला. तक्रारदार तेथे गेल्यावर गुजरने त्याच्याकडे लाचेची मागणी करून ती रक्कम पोलीसनाईक शरद जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. रक्कम जाधवकडे दिल्यावर त्याने ती पँटच्या उजव्या खिशात ठेवली. त्याचवेळी पथकाने त्याला आणि गुजरला पकडले. दोघांविरुद्ध कासेगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (वार्ताहर)अब तक पाचजण...वाळवा पोलीस उपविभागात आतापर्यंत सहायक फौजदार अशोक लाहिगडे (इस्लामपूर), पोलीस उपनिरीक्षक रमेश देशमुख (कुरळप), सहायक फौजदार एकनाथ पारधी (शिराळा) व आता सहायक पोलीस निरीक्षक अनिल गुजर, पोलीसनाईक शरद जाधव (कासेगाव) अशा पाचजणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
लाचखोर फौजदारासह पोलीस जाळ्यात
By admin | Updated: August 25, 2014 23:36 IST