तासगावच्या मोर्चायुद्धाला पोलिसांचा ‘ब्रेक’

By Admin | Updated: August 4, 2015 00:04 IST2015-08-03T23:56:18+5:302015-08-04T00:04:29+5:30

कारवाईचा इशारा : मारामारीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी, भाजपकडून आंदोलनासाठी निवेदन

Police breakdown of 'Tasgaon' war | तासगावच्या मोर्चायुद्धाला पोलिसांचा ‘ब्रेक’

तासगावच्या मोर्चायुद्धाला पोलिसांचा ‘ब्रेक’

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमश्चक्री झाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी मोर्चा काढण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीने पोलीस उपअधीक्षकांना दिले. भाजपकडूनही असेच निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. दोन्हीकडून मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट होताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांनी दोन्ही पक्षांना कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे हे मोर्चे पेल्यातील वादळच ठरण्याची शक्यता आहे.शनिवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. भाजपचे खासदार संजय पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अविनाश पाटील, युवराज पाटील, अमोल शिंंदे यांनी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांना सोमवारी दुपारी निवेदन दिले. या मोर्चाची बातमी सोशल मीडियावर फिरत असतानाच, भाजपकडूनही मोर्चा काढण्यात येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर फिरू लागली. भाजपचे जयवंत माळी आणि अन्य कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे निवेदन तहसील कार्यालयात दिले.मोर्चासंदर्भातील या निवेदनामुळे आणि सोशल मीडियावरील चर्चेमुळे दिवसभर प्रशासनाची आणि पोलिसांची धावपळ झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आवाहन करतानाच प्रसंगी कारवाईचा इशाराही त्यांनी दिल्यामुळे निर्माण झालेले वादळ सायंकाळी शांत झाले. (वार्ताहर)

दोन्ही पक्षांची वेगवेगळी भूमिका
दोन्ही पक्षांकडून एकाच दिवशी मोर्चा काढण्यात येणार असल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांनी कायदा व सुव्यवस्थेत बिघाड होऊ नये यासाठी मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे राष्ट्रवादीने मंगळवारचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपने लोकशाही मार्गाने मोर्चा काढणारच असल्याची भूमिका घेतली आहे.


कायदा आणि सुव्यवस्थेत बिघाड होऊ नये, यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मोर्चा काढल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, अविनाश पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याशीही चर्चा केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोर्चा काढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
- कृष्णात पिंंगळे, पोलीस उपअधीक्षक.

आम्ही मोर्चाचे निवेदन दिल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक मोर्चाचे निवेदन दिले. कायदा व सुव्यवस्थेत बिघाड होऊ नये, यासाठी पोलीस उपअधीक्षकांच्या आवाहनानुसार मोर्चा रद्द केला आहे. मात्र शनिवारच्या घटनेत खरा अन्याय कोणी कोणावर केला आहे, तालुक्यात गुंडगिरी आणि दहशतीचे राजकारण कोण करत आहे, हे जनतेला माहिती आहे. त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी मंगळवारी खुशाल मोर्चा काढावा.
- अविनाश पाटील, संचालक, तासगाव बाजार समिती, राष्ट्रवादी.

Web Title: Police breakdown of 'Tasgaon' war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.