मिरजेत लूटमार करणाऱ्या तोतया पोलिसास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:37+5:302021-07-17T04:21:37+5:30
मिरज : मिरजेत रस्त्यावर गाड्या अडवून पोलीस असल्याची बतावणी करून वाहनधारकांना लुटणाऱ्या भामट्यास गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. ...

मिरजेत लूटमार करणाऱ्या तोतया पोलिसास अटक
मिरज : मिरजेत रस्त्यावर गाड्या अडवून पोलीस असल्याची बतावणी करून वाहनधारकांना लुटणाऱ्या भामट्यास गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे.
मिरज-कोल्हापूर रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या अडवून पोलीस असल्याची बतावणी करून तसेच मास्क नाही, स्पीड जादा आहे, प्रवासी जादा आहेत, अशी कारणे सांगत प्रवासी व वाहनचालकांना लुटणाऱ्या नजीर नूरमहमद सय्यद (वय ३६, रा. अभयनगर, सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली. याबाबत वाहनचालक प्रवीण महावीर बोराडे (रा. मोडनिंब जि. सोलापुर) यांनी फिर्याद दिली आहे. कोल्हापूर रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी दुचाकी आडवी घालत नजीर सय्यद याने प्रवीण बोराडे यांची जीप अडवली. सय्यद याने पोलीस चिन्ह असलेले कीचेन दाखवत आपण पोलीस असल्याची बतावणी केली. मास्क न घालता गाडी चालवल्याबद्दल वीस हजार रुपये दंड होतो, असे सांगून एक हजार रुपये घेतले. तीन महिन्यांपूर्वीही सय्यद याने कारवाईची भीती घालून अडीच हजार रुपये घेतल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी सय्यद यास अटक करून त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.