कवठेमहांकाळमध्ये तरुणाचे मुंडके छाटले
By Admin | Updated: November 3, 2016 00:02 IST2016-11-03T00:02:09+5:302016-11-03T00:02:09+5:30
थबडेवाडी चौकातील घटना : छातीवर, गळ्यावर तलवार, कुऱ्हाड, कोयत्याने सपासप वार

कवठेमहांकाळमध्ये तरुणाचे मुंडके छाटले
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरातील जत-कवठेमहांकाळ रस्त्यावरील गजबजलेल्या थबडेवाडी चौकात अर्जुन बाळकृष्ण आटपाडकर (४४, रा. थबडेवाडी, ता. कवठेमहांकाळ) याचा अज्ञात हल्लेखोरांनी छातीवर, गळ्यावर, डोक्यात, पोटावर तलवार, कोयता, कुऱ्हाडीने सपासप वार करीत मुंडके छाटून निर्घृण खून केला. मृतदेह रस्त्यावर टाकून हल्लेखोर पसार झाले. भर चौकात खून झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता घडली.
अर्जुन आटपाडकर थबडेवाडीचा रहिवासी आहे. तो खासगी वाहतुकीच्या जीपवर चालक होता. सायंकाळी पावणेसात वाजता तो खासगी वाहतुकीची काळी-पिवळी जीप घेऊन कवठेमहांकाळ-जत रस्त्यावरील थबडेवाडी चौकात आला होता. गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून तो थबडेवाडी रस्त्याने चौकाच्या मुख्य ठिकाणी येत होता. त्याचवेळी पाठीमागून तीन ते चार हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यांनी तलवार, कुऱ्हाड, कोयत्याने अर्जुन आटपाडकरच्या डोक्यात, गळ्यावर, छातीवर, पोटावर सपासप वार केले. हे घाव एवढे वर्मी होते की, आटपाडकरचे शिर तुटले. हल्लेखोरांनी परत त्यास पायाला धरून ओढत आणून भररस्त्यावर वार करून त्याचे शिर तोडले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्लेखोरांनी तोंडाला काहीही बांधले नव्हते, अशी चर्चा घटनास्थळी होती.
या निर्घृण खुनाची बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. थबडेवाडी चौकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. चौकातील दुकाने, हॉटेल्स पटापट बंद झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला. रुग्णालयात आटपाडकरच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. त्यांचा आक्रोश सुरू होता. पोलिस निरीक्षक सिराज इनामदार अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
खुनाचे कारण अस्पष्ट
खुनाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. खुनाचे नेमके कारण अस्पष्ट असून, पोलिस घटनास्थळावर उपलब्ध माहितीवरून हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.