हिंदुत्ववादी संघटनांकडून व्यापाऱ्यांची लूट
By Admin | Updated: December 15, 2015 23:43 IST2015-12-15T23:17:36+5:302015-12-15T23:43:00+5:30
सुकुमार कांबळे : मारुती कांबळेंना मारहाणीच्या निषेधार्थ सांगलीत धरणे आंदोलन

हिंदुत्ववादी संघटनांकडून व्यापाऱ्यांची लूट
सांगली : मिरजेतील जनावरांच्या बाजारामधील व्यापाऱ्यांना हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांकडून त्रास दिला जात आहे. आर्थिक लूटही केली जात असून यातूनच मारुती कांबळे, पिंटू कांबळे यांच्यासह तिघांना अमानुष मारहाण केली आहे, असा आरोप डेमोक्रेटिक पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे सुरु केले.कांबळे म्हणाले, दि. १० डिसेंबर रोजी मारूती कांबळे, पिंटू कांबळे व वाहन चालक हे तिघे वाहनामधून बैलांची वाहतूक करीत होते. कांबळे शेतकऱ्यांना जनावरे पुरवतात. असे असताना रात्री दहाच्या दरम्यान मिरज-म्हैसाळ रस्त्यावर बैलाने भरलेले वाहन अडवून त्यांच्याकडे खंडणी मागण्याचा प्रयत्न केला आहे. कांबळे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे अंकुश गोडसे व विनायक माईनकर यांनी त्यांना बेदम मारहाण केली. पिंटू कांबळे व वाहन चालकासही मारहाण झाली. याप्रकरणी मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल करूनही कारवाई करण्याऐवजी मारुती कांबळे, पिंटू कांबळे, वाहकावर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले आहे. कांबळे यांच्याकडून ३५ हजार रूपये काढून घेतले असतानाही पोलिसांनी वाटमारीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांवर आणि पोलिसांवर शासनाने कारवाई करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.डीपीआयचे उपाध्यक्ष अशोक वायदंडे, कार्याध्यक्ष शिवाजीराव आवळे, नंदकुमार नांगरे, इंदुताई कोरपाळे, भीमराव कांबळे, सतीश लोंढे, अविनाश वाघमारे, हणमंत ऐवळे, सुनील होळकर, सतीश भंडारी आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)