जमीन नांगरून घेतली पूजनास माती
By Admin | Updated: December 22, 2016 23:36 IST2016-12-22T23:36:39+5:302016-12-22T23:36:39+5:30
सदाभाऊंचा उपक्रम : शिवरायांच्या पुतळ्याच्या चरणी अर्पण करणार

जमीन नांगरून घेतली पूजनास माती
रेठरेधरण : मुंबई येथे अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामास सुरुवात होत आहे. यासाठी रेठरेधरण (ता. वाळवा) येथील शेतातून मातीचा कलश घेऊन जाण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
सदाभाऊ खोत यांनी रेठरेधरण या त्यांच्या मायभूमीतून विश्वास दत्तात्रय धुमाळ यांच्या शेतात आठ-दहा बैल नांगराला जुंपून, तो नांगर हाकून जमिनीतून निघालेली माती शिवरायांच्या पुतळ्याच्या चरणी अर्पण करण्यासाठी कलशामध्ये भरुन घेतली.
रेठरेधरण-शिराळा रस्त्याशेजारील शेतामध्ये सकाळी दहा वाजता पाठीवर झूल टाकून सजविलेल्या आठ बैलजोड्या आल्या. त्यांच्या स्वागतासाठी धनगरी ढोल व पेठ येथील गोंधळी यांनी गोंधळ घालून कार्यक्रमाला शोभा आणली.
या कार्यक्रमाचे नियोजन ज्योतिर्लिंग महिला दूध संघाचे मार्गदर्शक दिलीप पाटील यांनी केले. यावेळी तहसीलदार सविता लष्करे, कृषी अधिकारी एस. एम. पठाण, दिलीप पाटील, विश्वास धुमाळ, चंद्रकांत पाटील, दादासाहेब राऊत, संजय घोरपडे, संदीप खोत, जयकर कचरे, भूषण पाटील, शशिकांत पाटील, प्रशांत पाटील, पांडुरंग पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)