इस्लामपुरातील भूखंड हडप करण्याचा डाव
By Admin | Updated: November 28, 2014 23:42 IST2014-11-28T23:23:07+5:302014-11-28T23:42:53+5:30
विक्रम पाटील : कासेगाव शिक्षण संस्थेवर आरोप

इस्लामपुरातील भूखंड हडप करण्याचा डाव
इस्लामपूर : कासेगाव शिक्षण संस्थेने यापूर्वी शहरातील शिराळा नाका, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील मोक्याचे भूखंड हडप करून तेथे बेकायदेशीर बांधकामे केली आहेत. आता क्रांतिसिंह नाना पाटील नगराच्या पूर्वेस असणारा अंदाजे १० कोटी रुपये किमतीचा पाच एकर क्षेत्रातील भूखंड हडपण्याचा डाव आखला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत या संस्थेला हा भूखंड मिळू देणार नाही, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाकडे तक्रार करणार असल्याची माहिती भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील व नगरसेवक विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विक्रम पाटील म्हणाले की, गेली १५ वर्षे राज्यात आघाडीचे सरकार असताना शहराच्या वैभवात भर घालणारी एकही मोठी योजना जयंत पाटील यांनी राबवली नाही. सत्तेच्या माध्यमातून पैसा व पैशातून सत्ता ही नीती वापरुन त्यांनी पालिकेतील सत्ता टिकवली आहे. या सत्तेच्या जोरावरच मोक्याचे भूखंड हडप करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे.
कासेगाव शिक्षण संस्थेला यापूर्वी शिराळा नाका परिसरातील भूखंड देण्यात आला. तेथे बेकायदेशीरपणे संरक्षक भिंतीचे बांधकाम केले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोरील भूखंड मिळवून तेथेही ६० फुटी रस्त्यामध्येच बेकायदेशीर बांधकाम सुरु केले होते. आता पुन्हा स. नं. ९९३/१ येथील ५ एकर शासकीय जागा मागणीचा डाव आहे. पालिकेतील मुख्याधिकारी व नगररचनाकारांनी या मागणीला आक्षेप नोंदवायला हवा होता. मात्र त्यांनीही सत्ताधाऱ्यांशी संगनमत करताना ना हरकत प्रमाणपत्र देण्यास संमती दिली आहे, ही बाब गंभीर आहे.
कोणत्याही परिस्थितीत हा भूखंड कासेगाव शिक्षण संस्थेला मिळू देणार नाही. हा भूखंड जनतेच्या मालकीचा राहण्यासाठी प्रसंगी संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला. (वार्ताहर)
बेकायदेशीर बांधकामे
शिराळा नाका परिसरातील सर्व्हे नं. ७८ मधील भूखंड देण्यात आला. तेथे विकास आराखड्यातील ८० फुटी रस्त्याच्या आरक्षणात बेकायदेशीरपणे संरक्षक भिंतीचे बांधकाम केले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोरील स. नं. १६२ मधील भूखंड मिळवून तेथेही विकास आराखड्यातील ६० फुटी रस्त्यामध्येच बेकायदेशीर बांधकाम सुरु केले होते. आता पुन्हा स. नं. ९९३/१ येथील ५ एकर शासकीय जागा मागणीचा डाव आखला आहे.