वसगडे-ब्रह्मनाळ रस्त्याची पावसामुळे दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST2021-06-17T04:18:49+5:302021-06-17T04:18:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : पलूस तालुक्यातील वसगडे ते ब्रह्मनाळदरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याची दुर्दशा झाली ...

वसगडे-ब्रह्मनाळ रस्त्याची पावसामुळे दुर्दशा
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी
: पलूस तालुक्यातील वसगडे ते ब्रह्मनाळदरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वसगडे-खटाव ते ब्रह्मनाळ असा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता आहे.
वसगडे येथील पाण्याची टाकी ते बिरोबा मंदिरापर्यंत जागोजागी
खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी गुडघाभर खोलीचे खड्डे आहेत. महावितरणच्या खटाव येथील सबस्टेशनजवळ गटारीची सोय नसल्याने शेतामध्ये साचलेले पाणी रस्त्यावर येत आहे.
पावसाचे पाणी साचून राहिल्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढून ती रस्त्यावर आलेली आहेत. कधीतरी एकेरी वाहतूक सुरू असते.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पलूस यांच्या अखत्यारित येतो.
सुखवाडी, ब्रह्मनाळ, खटाव या गावांना सांगली तसेच तासगाव, पाचव्या मैलाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. २०१९ रोजी कृष्णेला आलेल्या महापुरापासून या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. ब्रह्मनाळमध्ये बोट दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधी या परिसराच्या विकासासाठी मोठमोठ्या आश्वासनांची खैरात केली होती. हा रस्ता यापूर्वी मंजूर आहे, असे सांगितले जात होते. हा रस्ता पुन्हा एकदा जिल्हा नियोजनमधून मंजूर झाला असल्याची चर्चा आहे. पण प्रत्यक्षात या ठिकाणी कोणताच बदल झालेला नाही. कुणाला घ्यायचे त्याला श्रेय घेऊ द्यावे. परंतु मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी या रस्त्यावरचे खड्डे तरी मुजवून घ्यावे व दोन्ही बाजूला वाढलेली काटेरी झुडपे काढून घ्यावी, नागरिकांची सोय करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली आहे.