खानापूरच्या आठवडी बाजारात नियोजनाचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:14+5:302021-02-07T04:24:14+5:30
या बाजारात तालुक्यातील व्यापाऱ्यांसह आटपाडी, तासगाव तालुक्यातील व्यापारी, विक्रेते हजेरी लावतात. यामध्ये कपडे, स्टेशनरी, धान्य, शेती साहित्य, खाद्य पदार्थ, ...

खानापूरच्या आठवडी बाजारात नियोजनाचा बोजवारा
या बाजारात तालुक्यातील व्यापाऱ्यांसह आटपाडी, तासगाव तालुक्यातील व्यापारी, विक्रेते हजेरी लावतात. यामध्ये कपडे, स्टेशनरी, धान्य, शेती साहित्य, खाद्य पदार्थ, फळ तसेच भाजीपाला विक्रेते असतात.
आठ-दहा वर्षांपूर्वी आठवडा बाजार वेशीपासून जुने पोलीस ठाण्यापर्यंतच्या जुन्या पेठेत तसेच तासगाव रस्त्यावर भरत होता. मात्र सध्या बाजार केवळ तासगाव रस्त्यावरच भरत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ओढ्यापर्यंत नेहमी रहदारी असणाऱ्या रस्त्यावर बाजार भरत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. विशेष म्हणजे वेशीपर्यंतची जुनी पेठ, चांदणी चौकापर्यंतचा रस्ता पूर्णपणे मोकळा असतो. या रस्त्यावर एकही विक्रेता बसत नाही. या रस्त्यावर कसलीही वाहतूक, रहदारी नसते. जेथे बाजार भरतो, तेथे रस्त्याच्या दुतर्फा विक्रेते बसतात. परिणामी खरेदीसाठी बाजारात आलेल्या ग्राहकांना ये-जा करणेही कसरतीचे ठरत आहे.
बाजारात येणारे विक्रेते स्वत:च्या मनाप्रमाणे कोठेही बसतात. त्यामुळे ठरावीक ठिकाणी गर्दी राहते. बहुतांश रस्ते मोकळे राहतात. काही व्यापारी गुहागर-विजापूर राज्य मार्गावर बसतात. याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. संबंधितांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
चाैकट
या उपाययोजना हव्या
वाहतूक, रहदारी नसलेल्या रस्त्यावर बाजार हवा
विक्रेत्यांची रस्त्याच्या एकाच बाजूस व्यवस्था करावी
गुहागर-विजापूर मार्ग मोकळा राहावा
विक्रेत्यांना आवश्यक सोयी-सुविधा द्या
शेळ्या-मेंढ्यांचा बाजार सुरू करा
बाजारात पोलीस बंदोबस्त ठेवा
कोट
खानापूरच्या आठवडा बाजारात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जुन्या पेठेतील रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांना विश्वासात घेऊन बाजाराबाबत नियोजन केले जाईल.
- तुषार मंडले, नगराध्यक्ष
कोट
खानापूरच्या आठवडा बाजाराचे नियोजन गेल्या आठ ते दहा वर्षांपासून बिघडले आहे. याबाबत कोणीही लक्ष घालत नाही. बाजाराच्या विस्कळीतपणामुळे जुनी पेठ बंद पडली आहे. या ज्वलंत प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
- ओंकार कोरे, किराणा व्यापारी
फोटो-०६खानापुर१