सांगली/कवठेमहांकाळ : ‘चला जाणू या नदीला’ अभियानाअंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी, महांकाली व कमंडलू या नद्यांची स्वच्छता व पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नुकतीच कवठेमहांकाळमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेतली.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चला जाणू या नदीला या अभियानात जिल्ह्यातील सात नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कृष्णा, अग्रणी, महांकाली, तिळगंगा, येरळा, माणगंगा आणी कोरडा यांचा समावेश आहे. अग्रणी व महांकाली नद्यांच्या उपक्रमांसाठी जिल्हाधिकारी काकडे यांच्यासह जलसंपदा, पाटबंधारे, महसूल प्रशासन व या नद्यांच्या खोऱ्यांतील ग्रामस्थांची बैठक झाली.तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी नांगोळे, कोकळे, रांजणी आणि अग्रण धुळगाव या नदीखोऱ्यातील गावांची पाहणी केली. जल बिरादरीच्या माध्यमातून झालेल्या जलसंधारण कामांचा आढावा घेतला. त्यानंतर आगामी डिसेंबरपर्यंत पुनरुज्जीवनासाठीच्या कामांचे नियोजन केले. प्रामुख्याने अग्रणी, महांकाली व कमंडलू या नद्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्या अविरत निर्मल वाहत राहाव्यात यासाठी उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांनी कमंडलू या छोट्या नदीचा समावेशही अभियानात केला. मिरजेचे प्रांताधिकारी प्रत्येक महिन्याला तालुकास्तरावर बैठकांद्वारे या कामांचा आढावा घेतील.
बैठकीला सदस्य सचिव उप वनसंरक्षक सागर गवते, अग्रणी नदी केंद्रस्थ अधिकारी कार्यकारी अभियंता हर्षद यादव, महांकाली नदी केंद्रस्त अधिकारी कार्यकारी अभियंता रोहित कोरे, कार्यकारी अभियंता (मृदा व जलसंधारण विभाग) बाळासाहेब आजगेकर, उप जिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, कवठेमहांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, वनक्षेत्रपाल तसेच जल बिरादरीचे महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र चुघ, चला जाणू या नदीला मोहिमेचे जिल्हा समन्वयक डॉ. रवींद्र व्होरा, अग्रणी नदीचे समन्वयक डॉ. आबासाहेब शिंदे, महांकाली नदीचे समन्वयक अंकुश नारायणकर, सागर पाटील, तीळगंगा नदीचे समन्वयक प्रकाश पाटील, जैवविविधता तज्ज्ञ सुहास खांबे आदी उपस्थित होते.
नद्यांच्या खोऱ्यात ही कामे केली जाणारवन जमिनींवर खोल सलग समपातळी चरींची खोदाई, मातीचे नाला बांध, बांधावर वृक्ष लागवड, फळबाग लागवड, गायरान व वन जमिनींवर देवराई उभी करणे, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना गेट बसविणे, सांडपाणी थेट नदीपात्रात न सोडता त्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी वापरणे, जैवविविधता तज्ज्ञांच्या मदतीने नदीकाठावरील जैवविविधतेचा अभ्यास करणे, नदीपात्रातील अतिक्रमणे हटविणे, अग्रण धुळगाव येथील अग्रणी नदीवरील नादुरुस्त रोप वे दुरुस्त करणे ही कामे पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहेत.