सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगररांगांवर चहा लागवडीचा ‘पायलट प्रोजेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:27 AM2021-04-10T04:27:11+5:302021-04-10T04:27:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर चहा लागवडीचा ‘पायलट प्रोजेक्ट’ उभारण्यात येणार आहे. चहावर आधारित ...

'Pilot project' of tea cultivation on hills in Sangli-Kolhapur district | सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगररांगांवर चहा लागवडीचा ‘पायलट प्रोजेक्ट’

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगररांगांवर चहा लागवडीचा ‘पायलट प्रोजेक्ट’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर चहा लागवडीचा ‘पायलट प्रोजेक्ट’ उभारण्यात येणार आहे. चहावर आधारित उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या जीवनाला कलाटणी मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

राज्य शासनाचा पंजाबराव देशमुख ‘कृषिरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आष्टा (ता. वाळवा) येथे संजीव माने, कृषिभूषण सुनील माने, रवि पाटील, सचिन येवले यांच्यासह रामा लाड, प्रशांत पाटील यांचा कृषिमंत्री भुसे यांच्याहस्ते सत्कार व शेतकऱ्यांसाठी ऊसशेती परिसंवाद असा संयुक्त कार्यक्रम झाला. यावेळी भुसे बोलत होते.

यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील उपस्थित होते.

दादा भुसे म्हणाले, महाराष्ट्रात युरियाचा दोन लाख टन बफर स्टॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना युरिया मिळेल. केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत. त्या कमी करण्याबाबत पत्र दिले आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डोंगर भाग आहे. पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात चहाचे पीक घेण्यात येत होते. कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांच्यावतीने अभ्यास करून अनुभवाच्या आधारावर येथे पुन्हा प्रयोग करण्यात येतील. हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्यांना नफा मिळणारा उद्योग-व्यवसाय उपलब्ध होणार आहे. विदर्भ, नांदेड परिसरात हळद प्रक्रिया उद्योगासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. तिचा अहवाल मिळताच कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात हळद व त्यावरील प्रक्रिया उद्योगाबाबत निर्णय घेण्यात येईल.

सुरेश पाटील म्हणाले की, केळी, द्राक्षे, बेदाणा, पेरू यांचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा. द्राक्ष प्रक्रियेसाठी साताऱ्यात सतरा एकर, तर कोल्हापूर येथे हळद व द्राक्षप्रक्रिया उद्योगासाठी १६६ एकर जागा मिळावी.

यावेळी विशाल शिंदे, विराज शिंदे, श्रीकांत कबाडे, एल.बी. माळी, सुभाष देसाई, रणजीत पाटील, नागेश देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, बी. डी. माने उपस्थित हाेते.

Web Title: 'Pilot project' of tea cultivation on hills in Sangli-Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.