काँग्रेसच्या प्रचारपत्रकावर आबांचे छायाचित्र
By Admin | Updated: July 28, 2015 00:27 IST2015-07-28T00:18:14+5:302015-07-28T00:27:30+5:30
तासगाव बाजार समिती निवडणूक : राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

काँग्रेसच्या प्रचारपत्रकावर आबांचे छायाचित्र
दत्ता पाटील- तासगाव -तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पहिल्यांदाच तिरंगी लढत होत आहे. प्रचारासाठी सर्वच पक्षांनी अजेंडा जाहीर करून प्रचारपत्रके मतदारांपर्यंत पोहोचवली आहेत. काँग्रेसनेही अशी प्रचारपत्रके तयार केली आहेत. मात्र त्यावर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचेही छायाचित्र प्रसिध्द केले आहे. या छायाचित्रामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसप्रणित पॅनेल अशी तिरंगी लढत होत आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. तालुक्यात काँग्रेसची ताकद मर्यादित असूनदेखील तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी काँग्रेसप्रणित रयत शेतकरी सहकारी पॅनेलच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादीविरोधात आव्हान निर्माण केले आहे. या पॅनेलच्या प्रचारासाठी छापलेल्या प्रसिध्दी पत्रकावर वसंतदादा पाटील आणि आर. आर. पाटील यांचे फोटो छापले आहेत.
आर. आर. पाटील यांच्या नावावर राष्ट्रवादीने पॅनेल लावले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे महादेव पाटील यांनीही पक्षीय राजकारण बाजूला ठेवत आर. आर. पाटील यांच्या विचारांना महत्त्व देत प्रचारपत्रकारवर स्थान दिले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीत उमेदवारी डावलल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज आहेत, तर काही गावांना या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी देताना डावलले आहे. या नाराजीचा फायदा घेण्यासाठीच महादेव पाटील यांनी व्यूहरचना तयार केली असून, त्यासाठीच आर. आर. यांचा फोटो वापरला असल्याची चर्चा होत आहे.
आर. आर. पाटील यांचे बाजार समितीच्या उभारणीत मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच ७५ कोटी रुपये खर्चून विस्तारित मार्केट उभा रहात आहे. बेदाणा मार्केटच्या लौकिकात त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यांच्या विचाराने आणि त्यांना अभिप्रेत असणारा बाजार समितीचा विकास आमच्या पॅनेलच्या माध्यमातून करणार आहे. म्हणूनच त्यांचा फोटो आमच्या प्रचारपत्रकावर वापरला आहे.
- महादेव पाटील, तासगाव तालुकाध्यक्ष, काँग्रेस .