भेसळीच्या संशयावरून पेट्रोल पंप सील
By Admin | Updated: April 14, 2015 00:54 IST2015-04-14T00:54:22+5:302015-04-14T00:54:22+5:30
मालगावातील घटना : पंप चालक व ग्रामस्थांत वादावादी

भेसळीच्या संशयावरून पेट्रोल पंप सील
मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथे पेट्रोल व डिझेल भेसळीच्या ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन मिरज-मालगाव रस्त्यालगत असणारा जीजा पेट्रोलिंक हा हिंदुस्थान पेट्रोल कंपनीचा पंप रविवारी सील करण्यात आला. तालुका पुरवठा अधिकारी व पेट्रोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोल व डिझेलचा दर्जा तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले. ग्राहकांशी उध्दट वर्तन करणाऱ्या पंप चालकांकडून हा पंप कंपनीने ताब्यात घ्यावा, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. भेसळीवरून पंप चालक व ग्रामस्थांत जोरदार वादावादीही झाली.
मालगावजवळ हिंदुस्थान कंपनीचा जीजा पेट्रोलिंक हा पेट्रोल पंप आहे. बरेच दिवस बंद असलेला हा पंप कंपनीने म्हैसाळ येथील एकास चालविण्यासाठी दिला आहे. मात्र तो सुरु झाल्यापासून वादग्रस्त ठरला आहे. पेट्रोल व डिझेलच्या दर्जामध्ये सुधारणा न झाल्याने तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. एका ग्रामस्थाच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी पंप चालकाने उध्दट वर्तन केल्याने पंप चालक व ग्रामस्थांत जोरदार वादावादी झाली. माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सावंत, राजू भानुसे यांनी भेसळीचा संशय व्यक्त करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. कंपनीचे अधिकारी प्रदीप हेडाव यांनी या तक्रारीची दखल घेऊन हा पंप सील केला. हेडाव दुसऱ्या दिवशी सील काढण्यास व पेट्रोल, डिझेलचे नमुने घेण्यासाठी आले होते.
माजी सरपंच सावंत, संजय काटे व राजू भानुसे यांनी, संशयित पेट्रोल व डिझेलची प्रशासनातर्फे तपासणी झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. अजित भंडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर तालुका पुरवठा अधिकारी येळापुरे उपस्थित राहिले. हेडाव व पुरवठा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंपाचे सील काढले. दोन्ही अधिकाऱ्यांनी दर्जा तपासणीसाठी पेट्रोल व डिझेलचे नमुने घेतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विश्वास खांडेकर, विलास होनमोरे, तलाठी एस. डी. हंगे, मामा कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)