कामेरीत नियम, अटींसह गणेशोत्सवास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:31 IST2021-08-28T04:31:06+5:302021-08-28T04:31:06+5:30
सरपंच स्वप्नाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदूकाका पाटील, माजी सरपंच ...

कामेरीत नियम, अटींसह गणेशोत्सवास परवानगी
सरपंच स्वप्नाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदूकाका पाटील, माजी सरपंच अशोक कुंभार, दि. बा. पाटील, तानाजी माने, शहाजी पाटील, बंडाकाका पाटील, दिनेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मिळावी असा ठराव उपसरपंच योगेश पाटील यांनी मांडला होता.
आरोग्य केंद्रानजीक कामेरी-इस्लामपूर रस्त्यावर कृषिभूषण जगदीश पाटील यांच्या नावाची स्वागत कमान उभारणे, चौगले वस्तीनजीक तलावात विहीर काढून त्यातील पाणी गाव विहिरीत सोडून पावसाळ्यात व नदीवरील योजना बंद असताना गावाला पिण्यासाठी वापरणे, कोरोना नियम पाळून पहिली ते सातवी प्राथमिक शाळा सुरू करण्यास परवानगी देणे, आरोग्य केंद्रानजीकचा तलाव व परिसरातील स्वच्छता करून त्या परिसरात वृक्षारोपण करून पक्षी संग्रहालय करणे यांसह लसीकरण नोंदणीसाठी पूर्ण वेळ दिल्याबद्दल कोरोना ग्रामदक्षता समिती व ज्येष्ठ सदस्य अशोक कुंभार व नंदूकाका पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार यांनी सर्व स्वागत केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे, पोपट पाटील, संग्राम पाटील, पोपट कुंभार, किरण नांगरे, संजय पाटील, व्ही. एस. कोरे उपस्थित होते.