करगणीतील जनावरांच्या बाजारास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST2021-03-14T04:24:15+5:302021-03-14T04:24:15+5:30
करगणी : करगणी (ता. आटपाडी) येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या प्रसिद्ध खिलार जनावरांच्या बाजारास तीन दिवसांची परवानगी मिळाली आहे. १४ मार्चपासून ...

करगणीतील जनावरांच्या बाजारास परवानगी
करगणी : करगणी (ता. आटपाडी) येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या प्रसिद्ध खिलार जनावरांच्या बाजारास तीन दिवसांची परवानगी मिळाली आहे. १४ मार्चपासून बाजार भरणार आहे, अशी माहिती आटपाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड व सरपंच गणेश खंदारे यांनी दिली.
करगणीतील महाशिवरात्री यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आटपाडी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड व सरपंच गणेश खंदारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने मागणी केली. याची दखल घेत कोरोनाच्या नियमांचे पालन करून यात्रेऐवजी तीन दिवसांचा जनावरांचा बाजार भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
याबाबत प्रांताधिकारी संतोष भोर, पोलीस उपअधीक्षक इंगवले, तहसीलदार सचिन मुळीक यांच्या उपस्थितीत विटा प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, येणाऱ्या शेतकऱ्यांच्या तपासणीच्या अटीवर परवानगी दिली आहे.
करगणीतील खिलार जनावरांच्या बाजारासाठी सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी येतात. यंदा कोरोनामुळे तीन दिवस जनावरांचा बाजार भरवणार आहे. यासाठी आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. अविनाश चव्हाण, बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी सहकार्य केले.