जादा दराने खताची विक्री केल्यास विक्रेत्याचा परवाना कायमचा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:33+5:302021-05-28T04:20:33+5:30
सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे, खतांचाही पुरेसा साठा केला असल्याची ...

जादा दराने खताची विक्री केल्यास विक्रेत्याचा परवाना कायमचा रद्द
सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे, खतांचाही पुरेसा साठा केला असल्याची माहिती कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिली. जादा दराने खत विक्री केल्यास परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले की, खरिपासाठी ४ हजार ५६५ टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे, पैकी आजअखेर २५०० टन स्टॉक केला आहे.
केंद्र शासनाने खतासाठी जादा अनुदान जाहीर केल्याने खतांच्या किमती नियंत्रणात आल्या आहेत. शेतकऱ्यांना सुधारित कमी झालेल्या किमतीत खते उपलब्ध व्हावीत यासाठी सूचना दिल्या आहेत. सर्व खत कंपनी प्रतिनिधी व वितरकांना ऑनलाईन बैठकीतून सक्त आदेश दिले आहेत. जादा दराने खताची विक्री केल्यास विक्री परवाना निलंबित करण्यात येणार आहे. दुकानाचा परवानाही कायमस्वरूपी रद्द करण्याचा इशारा मास्तोळी यांनी दिला.
जिल्ह्यात खताचे घाऊक व किरकोळ असे एकूण ३ हजार १७५ वितरक आहेत. १५ एप्रिलपासून सहा नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. निविष्ठा गुणनियंत्रणासाठी ३२ गुणनियंत्रण निरीक्षक व ११ भरारी पथके नेमली आहेत. निविष्ठा वितरकांची तपासणी व बियाणे, खते, औषधांचे नमुने घेण्यात येत आहेत. परवाना नूतनीकरण नसल्याने तसेच जादा दराने खत विक्री केल्याबद्दल ३३ परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये मिरज २, वाळवा १०, शिराळा २, खानापूर २, तासगाव ७, कडेगाव, पलूस, आटपाडी प्रत्येकी १, कवठेमहांकाळ ३ व जतमधील ४ दुकानदारांचा समावेश आहे.
येत्या २९ व ३० मे रोजी जिल्ह्यातील सर्व निविष्ठा वितरकांची तपासणी भरारी पथकांमार्फत केली जाणार आहे.
चौकट
तक्रार करण्याचे आवाहन
जादा दराने निविष्ठा किंवा खतांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच जिल्हा स्तरावरील सहा नियंत्रण कक्षांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन मास्तोळी यांनी केले.