खासगी, सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट पंधरा दिवसांत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:31+5:302021-01-13T05:10:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिट पंधरवड्यात पूर्ण करण्याचे आदेश ...

Perform fire audits of private, government hospitals within fortnight | खासगी, सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट पंधरा दिवसांत करा

खासगी, सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट पंधरा दिवसांत करा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिट पंधरवड्यात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

भंडारा रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्यास सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी बैठक घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, मिरज शासकीय रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, कार्यकारी अभियंता एस. जी. मिसाळ, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, मिरज व सांगलीतील शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने करावे. त्रुटी व आवश्यक साधनसामग्रीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागास द्यावा. आरोग्य व सार्वजनिक बांधकामाने तो प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला द्यावा. विद्युत निरीक्षकांनी अन्य सर्व रुग्णालयांचे ऑडिट करावे. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवावा. अतिदक्षता विभाग, बालकांचे विभाग व गंभीर आजारी रुग्णांच्या विभागांचे ऑडिट प्राधान्याने करावे. आगीच्या कारणांचाही अभ्यास करावा.

डॉ. चौधरी म्हणाले, आरोग्य विभागाने त्यांच्याकडील उपकरणांचेही ऑडिट करून घ्यावे. विद्युत निरीक्षकांनी वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल तसेच उपजिल्हा रुग्णालये, आरोग्य केंद्रांचे इलेक्ट्रिकल ऑडिट करावे. त्यांच्या अहवालानुसार त्रुटींचे प्रस्ताव आरोग्य व बांधकाम विभागाने वरिष्ठांना सादर करावेत. तातडीच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जाईल.

चौकट

खासगी रुग्णालयांनीही ऑडिट करून घ्यावे

जिल्हाधिकारी म्हणाले, खासगी रुग्णालयांनी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्याकडून फायर ऑडिट करुन घ्यावे. इलेक्ट्रिकल ऑडिट स्वप्रमाणित करून घ्यावे. आपत्कालीन परिस्थितीसाठी कार्यालयातील अग्निरोधक यंत्रणा अद्ययावत करावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही द्यावे. परिस्थिती हाताळण्याची रंगीत तालीम वेळोवेळी घ्यावी. त्याचा अहवाल सादर करावा.

Web Title: Perform fire audits of private, government hospitals within fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.