‘घरातील’ लोकांनी कधीही त्रास दिला नाही
By Admin | Updated: May 21, 2015 00:01 IST2015-05-20T23:03:00+5:302015-05-21T00:01:18+5:30
दिलीप सावंत : सांगलीत निरोप समारंभप्रसंगी प्रतिपादन

‘घरातील’ लोकांनी कधीही त्रास दिला नाही
सांगली : पोलीस हेच माझ्या घरातील बांधव असून, तीन वर्षाच्या कालखंडात मला कधीही माझ्या ‘घरातील’ लोकांनी त्रास दिला नाही. उलट त्यांचे भक्कम सहकार्य मिळाल्यानेच बेसिक पोलिसिंगवर लक्ष केंद्रित करून गैरप्रकारांना आळा घालण्यात मला यश आले, असे भावोद्गार मावळते जिल्हा पोलीस प्रमुख दिलीप सावंत यांनी बुधवारी काढले.
पोलीस मुख्यालय आवारात आयोजित निरोप समारंभात सांगली पोलीस दलाच्यावतीने दिलीप सावंत यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख सुनील फुलारी यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
दिलीप सावंत म्हणाले की, शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील वसगडे आणि आष्टा येथील घटना वगळता, माझी सांगलीतील कारकीर्द समाधानकारक राहिली. त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या सर्वांसाठीच तो कालखंड हा मानसिक संतुलन बिघडविणारा असाच होता. परंतु काही झाले तरी, मी पोलिसांना वाऱ्यावर सोडले नाही. ते माझ्या घरातीलच असल्याने मी शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. सांगलीत काम करताना मी सामान्य माणूस हाच केंद्रस्थानी मानला व त्यांच्या हितासाठीच कार्य केले.
सांगलीमध्ये पोलीस दलामध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच सांगलीकरांकडूनही बरेच नवीन शिकायला मिळाले. गुन्हेगारीच्या विरोधात सांगली पोलिसांची नौका पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. ती नौका नूतन जिल्हा पोलीसप्रमुखांनी तशीच पुढे न्यावी, अशी अपेक्षाही सावंत यांनी व्यक्त केली.
व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग बनसोडे (मिरज) उपस्थित होते. (प्रतिनिधी)