आठ हजार निवृत्तधारकांचे निवृत्ती वेतन लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:27+5:302021-09-17T04:32:27+5:30

सांगली : जिल्हा परिषदेचे निवृत्त कर्मचारी तसेच सेवानिवृत्त शिक्षक अशा सुमारे आठ हजार जणांची पेन्शन लांबली आहे. निधी उपलब्ध ...

The pensions of eight thousand retirees have been extended | आठ हजार निवृत्तधारकांचे निवृत्ती वेतन लांबले

आठ हजार निवृत्तधारकांचे निवृत्ती वेतन लांबले

सांगली : जिल्हा परिषदेचे निवृत्त कर्मचारी तसेच सेवानिवृत्त शिक्षक अशा सुमारे आठ हजार जणांची पेन्शन लांबली आहे. निधी उपलब्ध असतानाही ती देण्यात प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असल्याबाबतची तक्रार सेवानिवृत्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष सुभाष मरिगुद्दी यांनी ही माहिती दिली.

कोरोनापासून कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सातत्याने परिणाम होत आहे. शासनाकडून पगार आणि सेवानिवृत्त पेन्शनधारकांसाठी तातडीने निधी दिला जातो; पण सहा महिन्यांपासून पेन्शन वेळेत दिली जात नाही. सेवानिवृत्त लिपिक, शिपाई यांच्यासह शिक्षक अशी मिळून आठ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेळेत पेन्शन देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पेन्शनसाठी शासनाकडून २६ ऑगस्टला निधी उपलब्ध झाला. प्रशासनाने ६ सप्टेंबरला उपलब्ध झाल्याचे सांगत पेन्शन जमा करण्यास टाळाटाळ केली.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना औषधोपचार तसेच घरखर्चासाठी पैशांची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पेन्शन वेळेत देण्यात येत नसल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी प्रशासनाला तत्काळ पेन्शन जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पेन्शन लांबविण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचा इशारा मरिगुद्दी यांनी दिला.

Web Title: The pensions of eight thousand retirees have been extended