तासगाव तालुक्यात वाळू तस्करांना दंड
By Admin | Updated: February 26, 2015 00:07 IST2015-02-25T23:32:37+5:302015-02-26T00:07:20+5:30
साडेनऊ लाख वसूल : तेराजणांवर कारवाई, रात्रीची गस्त सुरू

तासगाव तालुक्यात वाळू तस्करांना दंड
तासगाव : बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीची गस्त घालून सुमारे १३ जणांकडून ९ लाख ३0 हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी दिली.
दरम्यान, काल (मंगळवारी) मध्यरात्री बोरगाव येथे वाळू वाहतूक करीत असल्याप्रकरणी दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, तर ‘वाळू पकडण्यासाठी आलात तर बघून घेऊ’, असे म्हणून शासकीय कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी १0 ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सज्जन बोहरे यांनी दिली आहे.
सज्जन बोहरे दि. २४ रोजी रात्री ८.३0 च्या दरम्यान घरासमोर रस्त्यावर गप्पा मारत बसले असताना, चार-पाच दुचाकीवरुन १0 ते १२ जण त्यांच्याजवळ आले व ‘तुम्ही रात्रीच्यावेळी येरळा पात्रात गस्त का घालता, तुम्ही यायचे नाही’, असे म्हणून ते निघून गेल्याची फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार १0 ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे हातनूरचे तलाठी बाबासाहेब आनंदराव माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत मधुकर पाटील, चंद्रकांत भगवान पाटील व प्रमोद शहाजी पाटील (सर्व रो. बोरगाव) अशी संशयितांची नावे आहेत.
मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान बोरगाव हद्दीत वाळू भरलेले दोन ट्रॅक्टर व एक ट्रॉली मोकळ्या शेतात लावून संशयित निघून गेले होते. याबाबत चौकशी केल्यानंतर, ती वाहने या संशयितांची असल्याचे समजले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. (वार्ताहर)
चौदा वाहनांना दंड
प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या सूचनेनुसार तालुक्यात ठिकठिकाणी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांवर दंड केल्याचे तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले. बांधकामासाठी आवश्यक असणारे गौण खनिज घेताना पुरवठा धारकाला पावतीची मागणी करावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.