देशासाठी जिल्ह्याने दिले दीडशेजणांचे बलिदान
By Admin | Updated: January 26, 2015 00:36 IST2015-01-26T00:35:19+5:302015-01-26T00:36:50+5:30
पाच शहीद : नऊ हजार सैनिकांचे योगदान; देशप्रेमाच्या परंपरेत ऐतिहासिक कामगिरीने सांगलीचे नाव कोरले

देशासाठी जिल्ह्याने दिले दीडशेजणांचे बलिदान
अंजर अथणीकर / सांगली
स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी सांगली जिल्ह्यातील दीडशे जवानांनी बलिदान दिले आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुध्द केलेल्या चळवळीत पाचजण शहीद झाले आहेत. आज सांगली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार सैनिक कार्यरत असून, ७३ जणांनी सैन्यदलातील विविध सन्मान पटकावले आहेत.
स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, चीन व श्रीलंकेमधील बंडखोरांबरोबर झालेल्या युध्दात, तसेच अतिरेक्यांबरोबर झालेल्या लढ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील दीडशे जवानांनी आजपर्यंत बलिदान दिले आहे. देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आजपर्यंत विविध पदकांनी ७३ जणांना सन्मानित करण्यात आले आहे. १९७१ मध्ये पाकबरोबर झालेल्या युध्दात शहीद झालेले मणेराजुरीचे जवान पांडुरंग साळुंखे यांना मरणोत्तर महावीरचक्र पदक देऊन गौरविण्यात आले. सांगली जिल्ह्यात आजपर्यंत वीरचक्र पदकाने ८, शौर्य पदकाने १, सेना, नौसेना पदकाने २७, युध्दसेवा पदकाने १, अतिविशिष्ट सेवा पदकाने ५ व मिशन इन डिस्पॅच शौर्य पदकाने ३० जवानांना सन्मानित करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील माजी सैनिकांची संख्या १३ हजार ५५२ इतकी असून, दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या ४ हजार ८८७ इतकी आहे. दुसऱ्या महायुध्दातील हयात सैनिकांची संख्या ३४७, तर दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या ११६८ आहे. सीमेच्या रक्षणासाठी आज सांगली जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार ते ९ हजार सैनिक कार्यरत असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले यांनी दिली. स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व चळवळीतही सांगली जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. सुमारे पाच हजारहून अधिक ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी चळवळीत सहभाग घेतला.
ब्रिटिशांविरुध्द पुकारलेल्या युध्दात पाच स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले. यामध्ये अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, किसन अहिर, शेगाव (ता. वाळवा) येथील पाटील व किर्लोस्करवाडीचे पंड्याजी यांचा समावेश आहे.
पाच हजारावरून स्वातंत्र्यसैनिक आता ६० वर
स्वातंत्र्य चळवळीत अनेक ज्ञात-अज्ञातांनी सहभाग घेतला. त्यामध्ये सुमारे पाच हजार स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपट देण्यात आले. सुरुवातीला जे स्वातंत्र्यसैनिक अपंग, निराधार होते, त्यांना दीडशे रुपये मानधन देण्यात येत होते. १९७० च्या सुमारास स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. १९९५ मध्ये स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारस असलेल्या पत्नींची संख्या १९ हजार होेती. आता ही संख्या ६० वर आली आहे. सांगली शहरातील स्वातंत्र्यसैनिकांची संख्या सात आहे. स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारस पत्नीस आता अठरा हजारांची पेन्शन देण्यात येते.