पलूसला तीन फ्लॅट फोडले
By Admin | Updated: October 25, 2015 00:39 IST2015-10-25T00:39:33+5:302015-10-25T00:39:33+5:30
लाखाचा ऐवज लंपास : भरवस्तीतील प्रकारामुळे खळबळ

पलूसला तीन फ्लॅट फोडले
पलूस : पलूस येथील जिल्हा परिषद शाळेपाठीमागील शांतीदीप अर्पाटमेंटमधील तीन फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडल्याने पलूसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत स्मिता पंडित माने-पाटील यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी पहाटे हा प्रकार घडला.
स्मिता माने या रूग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ९३ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख १४ हजार रूपये लांबविले. दरवाजाचा कडीकोंयडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी अर्पाटमेंटमधील फ्लॅटना बाहेरुन कड्या घातल्याने चोरीचा प्रकार लक्षात आला नाही. सकाळी अपार्टमेंटमधील नागरिक फिरायला जात असताना हा प्रकार उघडकीस आला. यावेळी फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना फोन करून बोलावले असता आणखी दोन फ्लॅट फोडले असल्याचे लक्षात आले. पण या दोन घरातून चोरट्यांनी काहीही लंपास न केल्याने त्यांनी पोलिसात फिर्याद दिली नाही. (वार्ताहर)