आटपाडी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळाला पाहिजे. या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मेळावा झरे, ता. आटपाडी येथे झाला. यावेळी आमदार पडळकर बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदचे सदस्य शिवदास सागर, दिलीप घोडके, हणमंत वाघमारे, रामदास भोकरे, संजय खरात, जयवंत सरगर, विष्णुपंत अर्जुन आदी उपस्थित होते.
आमदार पडळकर म्हणाले, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर सुरू असणाऱ्या अन्यायाविरोधात झरे येथून रणशिंग फुंकले आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या हक्काचा पगार मागत असताना, त्यांना दोन महिने पगार दिला जात नाही. उलट खासगी ठेकेदाराचे पैसे महामंडळ देत आहे. एसटी कर्मचारी पगार वेळेत मिळत नसल्याने आत्महत्या करत आहेत. महाविकास आघाडी सरकार अशा किती एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करायला लावणार आहे, असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारला जाग केल्याशिवाय गप्प बसायचे नाही, असे आवाहनही त्यांनी एसटी कामगारांना केले.
चौकट
माधव काळे बनतायत वाझे
एसटी महामंडळातील सेवानिवृत्त असणारे माधव काळे यांना कुणाच्या सांगण्यावरून अजून कामावर ठेवले आहे. ते कुणाला पैसे वसुली करून देत आहेत. माधव काळे यांना तत्काळ काढून टाकत महामंडळातील वसुलीचा चाललेला धंदा बंद करा, अन्यथा महामंडळाचे कर्मचारी तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला.