संजयकाकांच्या कारखान्यांची मालमत्ता विक्री करुन एफआरपी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:07+5:302021-06-16T04:36:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तुरची (ता. तासगाव) एसजीझेड व एसजीए शुगर, नागेवाडी (ता. खानापूर) ...

संजयकाकांच्या कारखान्यांची मालमत्ता विक्री करुन एफआरपी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या तुरची (ता. तासगाव) एसजीझेड व एसजीए शुगर, नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर या दोन कारखान्यांकडे ४४ कोटी ६४ लाखाची शेतकऱ्यांची एफआरपी थकीत आहे. साखर आयुक्तांनी मालमत्ता विक्रीची नोटीस बजावूनही प्रशासनाने कारवाई केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून एफआरपी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन एफआरपी देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, संजयकाका यांच्या मालकीचे असलेल्या एसजीझेड व एसजीए शुगर या कारखान्यांकडे ३१ मार्च २०२१ अखेरीस शेतकऱ्यांनी घातलेल्या उसाची ३९ कोटी चार लाख रुपये एफआरपीची रक्कम होती. त्यापैकी दहा कोटी ५७ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले. उर्वरित २८ कोटी ४७ लाख रुपये थकीत आहेत. नागेवाडी येथील यशवंत शुगर कारखान्यांकडे एफआरपीची एकूण रक्कम ३२ कोटी ३७ लाख रुपये होते. त्यापैकी शेतकऱ्यांना १६ कोटी २० लाख रुपये मिळाले असून १६ कोटी १७ लाख रुपये थकीत आहेत. याबद्दल शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार साखर आयुक्तांनी संजयकाका पाटील यांच्या तासगाव एसजीझेड, एसजीए शुगर आणि यशवंत शुगरला थकबाकीप्रकरणी आरआरसीची नोटीस बजावली आहे. या नोटीसवर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली होती. ही नोटीस एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आली असून त्यानुसार संजयकाका पाटील यांच्या दोन्ही कारखान्यांवर मालमत्ता विक्रीची कारवाई करून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम द्यावी.
यावेळी अजित हलिगळे, जोतीराम जाधव, राजेंद्र माने, अशोक खाडे, शशिकांत माने, संदेश पाटील, गुलाब यादव, सचिन पाटील, भुजंग पाटील, संदीप शिरोटे, अनिल पाटील, सचिन महाडिक, तानाजी धनवडे, अख्तर संदे आदी उपस्थित होते.