पावसकरचा खून ‘सुपारी’ देऊन
By Admin | Updated: April 1, 2015 00:06 IST2015-03-31T23:02:41+5:302015-04-01T00:06:43+5:30
चौकशीत निष्पन्न : तपास ‘डीवायएसपीं’कडे सोपविला

पावसकरचा खून ‘सुपारी’ देऊन
सांगली : अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बसलेल्या शशिकांत पावसकर या तरुणाचा खून ‘सुपारी’ देऊन केला आहे, अशी धक्कादायक माहिती शहर पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. सहा महिने होऊन गेले तरी यातील मारेकऱ्यांना पकडण्यात तसेच त्यांची नावे निष्पन्न करण्यात यश न आल्याने खुद्द कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी
हा तपास पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे सोपविला आहे.
माधवनगर रस्त्यावरील पंचशीलनगर येथे राहणारा शशिकांत पावसकर एका रात्रीत घरातून अचानक गायब झाला होता. कृष्णा नदीत त्याचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्याच्या तोंडातून व नाकातून रक्तस्त्राव झाला होता. खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाले होते. शहर पोलिसांचा तपास सुरु झाला. एक-दोन महिने गेले, तरी कोणतेही धागेदोरे लागले नाहीत. मात्र हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व गुंडाविरोधी पथकानेही याच्या तपासात उडी घेतली होती. पण कुणालाही याचा छडा लावला आला नाही. तब्बल सहा महिने होऊन गेले तरी पोलीस आजही तपास सुरू असल्याचेच सांगत आहेत. आतापर्यंत अनेकांची चौकशी झाली असली तरी, यातून एक धागा हाती लागला नाही.
काल, सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना पावसकर खुनाचा गुन्हा प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर हा तपास शहर पोलिसांकडून काढून घेऊन तो पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांना करण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)
...पण पुरावे नाहीत
खुनाचे कारण स्पष्ट झाले आहे. खुनासाठी ‘सुपारी’ दिल्याची धक्कादायक माहितीही तपासातून पुढे आली आहे. आज-ना-उद्या याचा निश्चितपणे छडा लागेल, असे पोलीस अधिकारी छातीठोकपणे सांगत आहेत. मारेकऱ्यांची नावेही समजली असली तरी, त्यांच्याबद्दल कोणताही पुरावा मिळालेला नाही.