ऐनवेळच्या धावपळीमुळे रुग्णांचा प्रवास मृत्यूकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:08+5:302021-05-07T04:28:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आजार बळावल्यानंतर सरकारी रुग्णालयात रुग्णाला आणण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे हकनाक बळी जात आहेत. कोरोना काळात ...

Patients travel to death due to the rush of time | ऐनवेळच्या धावपळीमुळे रुग्णांचा प्रवास मृत्यूकडे

ऐनवेळच्या धावपळीमुळे रुग्णांचा प्रवास मृत्यूकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आजार बळावल्यानंतर सरकारी रुग्णालयात रुग्णाला आणण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे हकनाक बळी जात आहेत. कोरोना काळात बहुतांश खासगी रुग्णालये रुग्ण दाखल करून घेणे टाळत असल्यानेही बळींची संख्या वाढत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात एप्रिल महिन्यात १६६ रुग्णांचे मृत्यू ओढवले. त्यापैकी अतिदक्षता विभागात सर्वाधिक म्हणजे ११० रुग्ण दगावले. यातील सर्रास रुग्ण शेवटच्या क्षणी रुग्णालयात आणले होते. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव व विजापूर जिल्ह्यांतूनही रुग्ण येतात. यातील अनेक रुग्ण खासगी डॉक्टरांनी पाठविलेले असतात. विशेषत: इचलकरंजी, जयसिंगपूर येथून शेवटच्या क्षणी रुग्ण पाठविण्याचे प्रमाण जास्त आहे. रुग्ण वाचण्याची शक्यता कमी असल्याचे दिसताच शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. आजवर मिरज शासकीय रुग्णालयातही असे रुग्ण यायचे. सध्या तेथे फक्त कोविड रुग्णांना प्रवेश असल्याने सांगलीच्या रुग्णालयात गर्दी वाढत आहे.

अपघात, विषबाधा, सर्पदंश, जळीत, आत्महत्येचा प्रयत्न, खुनी हल्ले अशा दुर्घटनांत शेवटच्या क्षणी रुग्ण पळवत आणले जातात. यापैकी अनेकांचा वाटेतच मृत्यू होतो. एप्रिल महिन्यात झालेल्या मृत्यूंपैकी २४ रुग्ण रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत झाले होते. इचलकरंजी आणि जयसिंगपुरातील असे मृत्यू जास्त आहेत. दूर अंतरावरील कवठेमहांकाळ, जत, सांगोला, अथणी येथूनही भाजलेले, सर्पदंश झालेले रुग्ण अनेकदा रुग्णालयात येईपर्यंत दगावत असल्याचा अनुभव आहे.

चौकट

ऐनवेळची धावपळ नेते मृत्यूकडे

- कोरोना काळात अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करून घेणे थांबविले आहे. संसर्गाच्या भीतीने डॉक्टर रुग्णांना तपासून शासकीय रुग्णालयाकडे पाठवितात, अशावेळी उपचारांना विलंब होतो आणि रुग्ण दगावण्याचा धोका बळावतो.

- बाहेरील शहरांत रुग्ण खासगी रुग्णालयांतच शेवटपर्यंत ठेवले जातात. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच शासकीय रुग्णालयाकडे पाठविले जाते.

- कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वाढत असल्याने आजार अंगावर काढण्याची प्रवृती वाढली आहे. रुग्णालयात गेल्यानंतर अन्य रुग्णांपासून संसर्ग होण्याच्या भीतीने रुग्णालयात जाणे टाळले जात आहे. यामुळेही आजार गंभीर स्वरूप धारण करत आहेत. असे रुग्ण ऐनवेळी शासकीय रुग्णालयात येतात, उपचारांचा उपयोग न होता मरण पावतात.

कोट

आजार शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर रुग्णाला शासकीय रुग्णालयात आणण्याचे प्रमाण जास्त आहे. अशावेळी त्याच्या आजाराची कोणतीही पार्श्वभूमी माहिती नसताना उपचार करणे आव्हानात्मक बनते. गंभीर अपघाताचे रुग्णही शासकीय रुग्णालयात पाठविले जातात. दूर अंतरावरून येण्यामुळे वेळेत उपचार मिळत नाहीत, अशावेळी अत्यवस्थ रुग्ण रुग्णालयात येईपर्यंत दगावतो. अनेक अत्यवस्थ रुग्णांवर प्रयत्नपूर्वक उपचार करून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आमचे डॉक्टर यशस्वी झाले आहेत.

- डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, सांगली.

पॉईंटर्स

एप्रिलमधील आकडेवारी

विभाग मृत्यू टक्केवारी

आयसीयू ११० ६६

एनआयसीयू ३२ १९

कॅज्युलिटी ०० ००

ब्रॉट डेड २४ १४

एकूण मृत्यू १६६ --

Web Title: Patients travel to death due to the rush of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.