अभंगवाणीने सिद्धेवाडीच्या विलगीकरण कक्षातील रुग्ण मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:29+5:302021-05-31T04:20:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालगाव : सिद्धेवाडी (ता. मिरज) येथे आयोजित करण्यात आलेल्या अभंगवाणीने विलगीकरण कक्षात उपचार घेणारे ...

अभंगवाणीने सिद्धेवाडीच्या विलगीकरण कक्षातील रुग्ण मंत्रमुग्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
मालगाव : सिद्धेवाडी (ता. मिरज) येथे आयोजित करण्यात आलेल्या अभंगवाणीने विलगीकरण कक्षात उपचार घेणारे रुग्ण मंत्रमुग्ध झाले. मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांनी कोरोनावर मात करण्यास वेगळी ऊर्जा मिळाल्याची भावना रुग्णांनी व्यक्त केली.
सिद्धेवाडी येथे कोरोना संसर्ग वाढू लागल्याने व ग्रामपंचायत दक्षता समिती, आरोग्य कर्मचारी, आशासेविका यांनी केलेल्या प्रबोधनाच्या प्रभावाने संशयित कोरोना रुग्ण प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात दाखल होत आहेत. सध्या कक्षात अकरा रुग्ण आहेत. काही रुग्ण कोरोनामुक्त होऊन कक्षातून बाहेर पडले आहेत. दक्षता समितीचे अध्यक्ष रामचंद्र वाघमोडे, महावीर खोत, पोलीस पाटील मनिषा धडस, दादासोा धडस, अशोक गरंडे, अर्जुन (राजू) खोत व ग्रामसेवक विनायक मोरे यांनी विलगीकरण कक्षात तळ ठोकून रुग्णांना मूलभूत सुविधा देत आहेत. कोरोना रुग्णांसाठी करमणूक होऊन आजारपणाचा विसर पडावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी हरिभक्त पारायण मंडळाचे संतोष आंबे, दादा सरगर, प्रशांत आंबे, राजाराम गेजगे, राघवेंद्र पवार, अण्णा खोत, सुभाष फडतरे या युवकांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. सादर केलेल्या विविध संताच्या सुश्राव्य अभंगवाणीने विलगीकरण कक्षातील रुग्ण मंत्रमुग्ध झाले. धनगरी ओव्या, व्याख्यान, गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
चौकट
करमणुकीने कोरोनाचा विसर !
विलगीकरण कक्षात दाखल झाल्यानंतर दडपणाखाली होतो, मात्र, वेळेवर उपचार, नाष्टा, जेवणाची सोय, याबरोबर मन प्रसन्नतेसाठी होणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी आम्हाला वेगळी ऊर्जा मिळत आहे. कोरोनाचा आम्हाला विसर पडल्याची भावना कक्षातील कोरोना रुग्णांनी व्यक्त केली.