सिव्हिलमध्ये एकमार्गी प्रवेशामुळे रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:12+5:302021-07-08T04:18:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील शासकीय रुग्णालयात तीन जिल्ह्यांतील रुग्णांचा नेहमीच राबता असताना मुख्य प्रवेशद्वाराची एक बाजू बंद ...

सिव्हिलमध्ये एकमार्गी प्रवेशामुळे रुग्णांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील शासकीय रुग्णालयात तीन जिल्ह्यांतील रुग्णांचा नेहमीच राबता असताना मुख्य प्रवेशद्वाराची एक बाजू बंद करीत रुग्णांचे हाल होत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रवेशद्वारावरील छताचा स्लॅब कोसळल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी यामुळे रुग्णांना खाली उतरून आत प्रवेश करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने छताची दुरुस्ती करून दोन्ही बाजू सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
शासकीय रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग असून, उत्तरेकडील बाजूने आत प्रवेश केल्यानंतर रुग्णवाहिका थेट प्रवेशद्वारात जात होत्या. तिथून स्ट्रेचरवरून रुग्णांना आत नेणे सोयीचे होते. मात्र, प्रवेशद्वारावरील काही भाग महिनाभरापूर्वी कोसळला होता. त्यामुळे प्रशासनाने पोलीस कक्ष असलेली बाजू काठ्या लावून बंद केली आहे. त्यामुळे आता याठिकाणी मोकाट कुत्र्यांचे साम्राज्य असते.
सध्या उत्तर बाजूने रुग्णालयात आलेल्या रुग्णांना खालीच वाहनातून उतरून प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने छताची तत्काळ दुरुस्ती करून बंद केलेला भाग सुरू करण्याची मागणी होत आहे.