कवठेमहांकाळमध्ये पाणी बंद
By Admin | Updated: September 17, 2015 23:10 IST2015-09-17T23:10:45+5:302015-09-17T23:10:45+5:30
दोन तालुक्यातील ३९ गावांचा प्रश्न गंभीर : १४ कोटींचे वीज बिल थकित

कवठेमहांकाळमध्ये पाणी बंद
कवठेमहांकाळ : ऐन गणेशोत्सवाच्या सणातच ३९ गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने तालुक्यात प्रशासनाच्या विरोधात तसेच ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळातच पिण्याचे पाणी बंद केल्याने नागरिकांनी या भोंगळ कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या तीन दिवसांपासून तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांमध्ये पिण्याचे पाणी बंद झाल्याने पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. कवठेमहांकाळ, मणेराजुरी आणि विसापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा वीज बिल न भरल्याने तोडण्यात आला आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील ३९ गावांना पिण्याच्या पाण्यापासून गेले तीन दिवस वंचित राहावे लागले आहे. त्यातच गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने ऐन सणाच्या सुरुवातीलाच नागरिकांना पिण्याच्या पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीचे कारभारी व तालुका प्रशासन झोपा काढीत आहे काय?, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.औदुंबरमधून कृष्णा नदीतून कवठेमहांकाळ, मणेराजुरी, विसापूर या प्रादेशिक पाणी योजनांतून दोन तालुक्यातील ३९ गावांना पिण्याचे पाणी दिले जाते. या तीनही योजनांकडे वीज महावितरण कंपनीचे सुमारे चौदा कोटी रुपये वीज बिल येणे बाकी आहे. गेल्या चार महिन्यात प्रशासनाने या थकित बिलाचा एकही रुपाया भरला नसल्याने, वीज महावितरणने धडक मोहीम राबवित या योजनेचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे दि. १५ सप्टेंबरपासून तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.प्रत्येक महिन्याला या तीनही योजनांचे पंचवीस लाख रुपये वीज बिल येते. ग्रामपंचायतीला पाणीपट्टी गोळा करून पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे हे पैसे जमा करावे लागतात व तेथून ही वीज बिलाची रक्कम भरली जाते. परंतु आॅगस्ट महिन्यापासून पैसेच न दिल्याने अखेर, महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्यायला पाणी मिळणार का?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. (वार्ताहर)
पाण्याचा प्रश्न ऐरणीवर --कवठेमहांकाळ, मणेराजुरी व विसापूर प्रादेशिक पाणी योजनेचे थकित १४ कोटी वीज बिल न भरल्याने महावितरणने या योजनेचे कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ३९ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.