खासगी आराम बसचालकांकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:41+5:302021-09-15T04:30:41+5:30
कोकरूड : खासगी आराम बसचालकांकडून मुंबई, ठाणेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांकडून तिप्पट दर आकारात लूट करण्यात येत आहे. याकडे ...

खासगी आराम बसचालकांकडून प्रवाशांची लूट
कोकरूड : खासगी आराम बसचालकांकडून मुंबई, ठाणेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांकडून तिप्पट दर आकारात लूट करण्यात येत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
गणेश उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यातील मुंबई, ठाणे यासारख्या मोठ्या शहरातील लोक गावी आले आहेत. कोरोनामुळे अनेकांचे नोकरी, व्यवसाय गेले आहेत. गावी राहूनही परवडत नसल्याने लोक कमी पगारात कसेतरी दिवस काढत आहेत. चांदोली ते मुंबई, ठाणे येथे नियमित साडेतीनशे रुपये प्रति प्रवासी आकारले जात होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी गणेश उत्सवानिमित्त मुंबई, ठाणे यासह अन्य ठिकाणाहून गावी आलेल्या प्रवाशांकडून प्रति प्रवासी नऊशे ते बाराशेपर्यंत तिकीट भाडे आकारण्यात येत आहे. गावी आलेले भक्त मंगळवारी गणेशविसर्जन करून पुन्हा परतीच्या प्रवासाला जात आहेत. परंतु खासगी आराम बसचालकांकडून नियमित प्रवासी भाडे न आकारता खासगी आराम बसचालकांकडून पुन्हा प्रति प्रवासी नऊशे ते हजार रुपये असे तिप्पट भाडे आकारात असल्याने प्रवाशांची लूट सुरू आहे. चांदोली, मलकापूरहून दररोज दहा ते पंधरा आराम बस ये-जा करत असतात. मात्र, गणेश उत्सवकाळात प्रवासी भाडे तिपटीने मिळत असल्याने गाड्यांची संख्याही दोन्ही मार्गांवर दुपटीने वाढली आहे. चांदोली, मलकापूर मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या कडून चारशे ते साडे चारशे तिकीट असताना ही खासगी बसचालक तिप्पट पैसे घेत असल्याने संबधित विभागाने लक्ष देण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
कोट
सर्व महिने एकच तिकीट ठेवावे. सिझन, ऑफ सिझन अशी वेगवेगळी तिकीट आकारणी करू नये. एकच दर ठेवावा. याबाबत शिराळा-शाहूवाडी प्रवासी संघटनेकडून खासगी बसचालकांना निवेदन दिले आहे. मात्र, तरीही जादा दराने आकारणी होत असल्याने यापुढे आंदोलन करण्यात येईल.
-सिद्धिविनायक चव्हाण, पदाधिकारी, शिराळा शाहूवाडी प्रवासी संघटना.
चौकट
एसटीने प्रवास करावा
शिराळा, मलकापूर आगाराने सकाळी, सायंकाळी बस सुरू केल्या आहेत. तिकीटही चारशे रुपये असताना लोक खासगी बसकडे वळत आहेत. यामुळे स्वतःलाच आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे. खासगी बसचालकांकडून आर्थिक लूट थांबविण्यासाठी एसटी बसनेच प्रवाशांनी प्रवास करावा, अशा प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.