कवठेमहांकाळ : जतहून सांगलीकडे भरधाव निघालेली खासगी प्रवासी जीप (वडाप) चालकाचा ताबा सुटल्याने नांगोळे फाट्यावर उलटली. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. यामध्ये जत व सांगली येथील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. चालक कृष्णदेव काळे फरारी झाला आहे.
याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काळी पिवळी जीपगाडी (क्र. एमएच १० एडब्ल्यू ४००३) प्रवाशांना घेऊन जतहून सांगलीकडे निघाली होती. चालक कृष्णदेव पांडुरंग काळे (वय ३७, रा. बाज, ता. जत) भरधाव वेगाने गाडी चालवत होता. जत-कवठेमहांकाळ रस्त्यावर नांगोळे फाट्यावर ती आली असता, चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे जीप चार-पाच पलटी घेऊन रस्त्यावर उलटी झाली. त्यामुळे सहा प्रवासी गंभीर जखमी झाले.
जखमींची नावे : तानाजी खंडू थोरात (१८, रा. बाज), सुनीता संतोष मलमे (रा. कुडनूर, ता. जत), संगीता खंडू थोरात (३४, रा. बाज), लैला शेख (६०, रा. सांगली), कमला लक्ष्मण एवळे (६०, रा. बाज), श्रेयश सुरेश मलमे (पाच वर्षे, रा. कुडनूर). त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. चालक कृष्णदेव काळे फरारी झाला आहे.
पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोडे, दीपक गायकवाड, अनिल भोसले तपास करीत आहेत.