मिरज सिव्हीलमध्ये कोरोना चाचण्यांचा पाच लाखांचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:25+5:302021-08-14T04:32:25+5:30
सांगली : मिरज शासकीय रुग्णालयातील कोरोना चाचण्यांनी तब्बल पाच लाखांचा टप्पा पार केला आहे. संपूर्ण राज्यात संख्यात्मकदृष्ट्या मिरजेची प्रयोगशाळा ...

मिरज सिव्हीलमध्ये कोरोना चाचण्यांचा पाच लाखांचा टप्पा पार
सांगली : मिरज शासकीय रुग्णालयातील कोरोना चाचण्यांनी तब्बल पाच लाखांचा टप्पा पार केला आहे. संपूर्ण राज्यात संख्यात्मकदृष्ट्या मिरजेची प्रयोगशाळा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूरची प्रयोगशाळा पहिल्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठिकठिकाणी कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला, त्यामध्ये पहिल्याच टप्प्यात मिरजेचा समावेश होता. त्यानुसार एप्रिल २०२०मध्ये प्रयोगशाळा प्रत्यक्ष सुरु झाली. सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील स्वॅबची तपासणी मिरजेतच होत होती. सुरुवातीला दररोज ५०० ते ७०० तपासण्या व्हायच्या. रुग्णसंख्या वाढेल तशा चाचण्याही वाढत गेल्या. ताण वाढू लागल्याने कोल्हापुरात प्रयोगशाळा सुरु करण्यात आली. कोल्हापूरसह कोकणातील नमुन्यांच्या तपासण्या कोल्हापुरात होऊ लागल्या, त्यामुळे मिरजेवरील ताण कमी झाला.
आजमितीस २४ तास प्रयोगशाळा सुरु असते. अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व विभागप्रमुख डॉ. वनिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंकज जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे, डॉ. मीना रामतीर्थकर ही टीम नियोजन करत आहे. दुसऱ्या लाटेत पुणे-मुंबईच्या तुलनेत कोल्हापूर आणि सांगलीत रुग्णसंख्या जास्त झाल्याने येथील आरटीपीसीआर चाचण्यांची संख्याही वाढली. सध्या दररोज तीन हजार तपासण्या केल्या जातात. त्यानंतर २४ तासांत रुग्णाला अहवाल दिला जातो.