साळुंखेची परमवीरसिंगवर मात
By Admin | Updated: April 16, 2015 00:00 IST2015-04-15T23:40:08+5:302015-04-16T00:00:59+5:30
विट्यात कुस्ती मैदान : हजारो शौकिनांची हजेरी

साळुंखेची परमवीरसिंगवर मात
विटा : येथे नाथाष्टमी उत्सवानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात हिंदकेसरी सुनील साळुंखे याने भारत केसरी परमवीरसिंग याला अवघ्या सातव्या मिनिटात घिस्सा डावावर अस्मान दाखवून पहिल्या क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस पटकाविले.
येथे नाथाष्टमीनिमित्त मंगळवारी मायणी रस्त्यावरील भैरवनाथ मंगल कार्यालयाशेजारील पटांगणात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. जयहिंद साळुंखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सोलापूरचा मल्ल हिंदकेसरी सुनील साळुंखे विरुद्ध पंजाबचा भारत केसरी मल्ल परमवीरसिंग यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी लक्षवेधी लढत झाली. माजी आमदार सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष वैभव पाटील, उत्तम पाटील व पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. सुनील याने सुरुवातीलाच परमवीरसिंंगचा ताबा घेतला. त्यावेळी परमवीरसिंगने सुनीलच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पाचव्या मिनिटात सुनीलवर परमवीरसिंगने ताबा घेतला. मात्र, चपळ सुनीलने त्याच्या ताब्यातून सुटून सातव्या मिनिटातच घिस्सा डावावर परमवीरसिंगला चितपट करून हजारो कुस्तीशौकिनांची वाहवा मिळविली.
नागेवाडीचा मल्ल सूरज निकम विरुद्ध मल्ल महेश वरुटे यांच्यातील लढतीत सूरजने महेशवर घिस्सा डावावर विजय मिळविला. मैदानात पन्नास ते पंचावन्न लहान-मोठ्या कुस्त्या झाल्या. नवनाथ तामखडे, बबलू नरळे, विशाल दार्इंगडे, संदीप जाधव, नीलेश पवार, अभिजित पवार, विजय गुजले, प्रवीण चौधरी, अक्षय जाधव, रणजित खांडेकर, नाथा ठोंबरे, दत्ता पाटील, सचिन पाटोळे, सतीश मुंडे, धनाजी पाटील, तुषार कदम, पोपट कांबळे, सुहास आटपाडकर, सोहेल शिकलगार, अनुकेश ताटे, विक्रम राऊत यांनी निकाली कुस्त्या केल्या.
विजयी मल्लांना श्री नाथाष्टमी उत्सव समितीच्यावतीने बक्षिसे देण्यात आली. (वार्ताहर)