अग्निशमन कार्यालयात कर्मचाऱ्यांची पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:40+5:302021-06-30T04:17:40+5:30
सांगली : कोरोना संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असताना महापालिकेच्या अग्निशमन कार्यालयात मात्र मंगळवारी मेजवानीचा बार ...

अग्निशमन कार्यालयात कर्मचाऱ्यांची पार्टी
सांगली : कोरोना संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असताना महापालिकेच्या अग्निशमन कार्यालयात मात्र मंगळवारी मेजवानीचा बार उडवून देण्यात आला. या मेजवानीची छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रेमापोटी जेवण दिल्याची सारवासारव विभागप्रमुखांनी केली.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महापालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. लग्न समारंभ, अंत्यविधी अशा कार्यक्रमांना ही संख्येची मर्यादा घालून दिली आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांवर निर्बंध लादले जात असताना महापालिकेची यंत्रणा मात्र नियमांना बगल देण्यात अग्रेसर असल्याचेच मंगळवारी दिसून आले.
टिंबर एरियातील महापालिकेच्या मुख्य अग्निशमन कार्यालयात दुपारी मोठ्या संख्येने कर्मचारी जमा झाले होते. इमारतीच्या पार्किंग जागेत कर्मचाऱ्यांची मेजवानी सुरू होती. ५० ते ६० कर्मचारी जेवणासाठी उपस्थित असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असताना एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जेवणाचा बेत आखल्याने एकच खळबळ उडाली.
चौकट
कोट
अग्निशमन विभागाकडील एक कर्मचारी दोन दिवसांत सेवानिवृत्त होत आहे. या कर्मचाऱ्याने विभागातील सहकाऱ्यांसाठी जेवणाचे नियोजन केले होते. त्याने घरी जेवण बनवून कार्यालयात आणले. जेवणासाठी २० ते २५ जणच होते. कोरोना नियमांचे पालनही केले आहे.
- चिंतामणी कांबळे, अग्निशमन विभागप्रमुख