जत येथील महसूल विभागाच्या सभागृहात तलाठी व ग्रामसेवकांची बैठक घेण्यात आली. थकीत वीज बिले, कोरोनामुक्त गाव अभियान, सौर कृषी योजना पथदिवे प्रस्ताव आदी विषयांच्या आढावा बैठकीत आमदार सावंत बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, जि.प. सदस्य सरदार पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे उपस्थित होते.
आ. सावंत म्हणाले की, सध्या जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी काही भागांत आले आहे. शिवाय काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होत नाही. यासाठी गावच्या पाणीपुरवठा योजनेची, दिवाबत्ती व इतर थकीत वीज बिले तातडीने भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. बुधवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी जत तालुक्यातील वीज प्रश्नाबाबत बैठक झाली. ऊर्जामंत्री राऊत यांनी जत तालुक्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनामुक्त गाव अभियानात भाग घेताना गावाचे लसीकरण पूर्णपणे होण्यास प्राधान्य द्यावे.
प्रांताधिकारी आवटे म्हणाले की, सौर कृषी योजनेंतर्गत तालुक्यातील ६० गावांत एकूण १,६५० हेक्टर गायरान जमीन उपलब्ध आहे. एका सोलर योजनेसाठी २५ एकर क्षेत्राची आवश्यकता आहे. त्यानुसार गावकामगार, तलाठी, अशा क्षेत्रातील उतारे व इतर माहिती संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना देतील. त्यांनी तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाठवावा.
दरम्यान, आढावा बैठकीत ‘यूथ फॉर जत’ या संस्थेच्या वतीने कोरोनाच्या रुग्णांसाठी दोन बायकॅप ऑक्सिजन मशीन आमदार सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.