पारावरच्या गप्पा ते माळावरच्या खेपा...

By Admin | Updated: October 16, 2014 00:09 IST2014-10-15T23:15:08+5:302014-10-16T00:09:21+5:30

विधानसभा निवडणूक : मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचविण्याची चुरस; कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे गोंधळाला ‘चेक’

Parrot chat | पारावरच्या गप्पा ते माळावरच्या खेपा...

पारावरच्या गप्पा ते माळावरच्या खेपा...

सांगली : मतदानाचा दिवस अखेर उजाडला... मतदान केंद्र्राच्या आचारसंहितेच्या पांढऱ्या लक्ष्मणरेषा स्पष्टपणे दिसू लागल्या... मतदान केंद्रांवरची सकाळ मतदारांच्या प्रतीक्षेत सुरू झाली. हळूहळू गर्दी वाढेल तशा पारावरच्या गप्पा आणि माळावरच्या मतदारांना आणण्याच्या खेपांना गती आली. सूर्य डोईवर येईपर्यंत संपूर्ण जिल्हाभर निवडणुकीचे वातावरण तापले. चुरस, तणाव, वादावादी आणि थोडासा गोंधळ झाला तरीही, मतदान शांततेत पार पडले आणि प्रशासनाचा जीव भांड्यात (मतदान यंत्रात) पडला. सांगलीत सकाळी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसत होती. केंद्र्रातील कर्मचाऱ्यांना मतदारांची प्रतीक्षा लागली होती. पक्षीय बुथही सकाळी आठ वाजेपर्यंत रिकामे होते. कार्यकर्ते आल्यानंतर त्यांनी बुथचा ताबा घेतला. सांगलीत सकाळी ९ वाजेपर्यंत ८ ते १0 टक्के मतदान झाले होते. सांगली शहरातील मतदानाचा हा वेग दिवसभर तसाच राहिला. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदानाचे चित्र वेगळे दिसत होते. शहरात सकाळी निरुत्साह दिसत असतानाच ग्रामीण भागात उत्साहाने मतदानासाठी लोक बाहेर पडताना दिसत होते. कर्नाळ येथे सकाळी साडेनऊ वाजताच पारावरच्या गप्पा रंगल्या होत्या. कुणी बसची वाट पाहत होते, तर कुणी निवडणुकीत काय होणार, याची चर्चा करीत होते. गावाच्या मुख्य चौकात गर्दी होती. या ठिकाणी दहा वाजेपर्यंत २0 टक्केच मतदान झाले होते. तसेच शेजारीच असलेल्या नांद्रे गावात सकाळी दहापर्यंत १0 टक्केच मतदान झाले होते. नांद्रेतील केंद्र सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ओस पडले होते.पलूस-कडेगाव मतदारसंघात सकाळपासूनच चुरस दिसून येत होती. वसगडे येथे साडेदहा वाजेपर्यंत २५ टक्के मतदान झाले होते. या ठिकाणीही गावातील मुख्य चौकात राजकीय चर्चा रंगल्या होत्या. तशाच गप्पांचा फड अमणापूर येथेही सुरू होता. सोसायटीच्या कार्याशेजारील इमारतीच्या कट्ट्यावर गावकऱ्यांची गर्दी होती. निवडणुकीत काय होणार, कोणाबद्दल कशी नाराजी आहे, मोदींकडे बघून किती मतदान होणार, याविषयीची चर्चाही रंगली होती. अमणापुरात सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ३१.९५ टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्र रिकामे असले तरी तासागणिक मतदानाचे आकडे वाढत होते. तासगाव - कवठेमहांकाळमध्येही कार्यकर्ते, समर्थकांमधील तणाव स्पष्टपणे जाणवत होता. नेत्यांचे समर्थक बुथवर ठाण मांडून बसले होते. (प्रतिनिधी)

आधी स्वच्छता, मग मतदान
सांगलीच्या खणभाग परिसरात सकाळी नऊ वाजता घंटागाडीवरील काही महिला कर्मचारी कचरा गोळा करण्यात मग्न होत्या. त्यांना मतदान केले का?, असे विचारल्यानंतर त्यांनी ‘आधी स्वच्छता, मग मतदान’, असे मोजकेच उत्तर दिले.
आमचं काय घर चालवाया येत्यात व्हय?
चिंचणीजवळील एका शेतात काम करणाऱ्या एका दाम्पत्याने नुकतेच मतदान केले होते. गावात काय होणार?, असा सवाल उपस्थित केल्यानंतर ते संतापाने म्हणाले, ‘काय का हुईना. आमचं काय घर चालवाया कुणी येतंय व्हय. मतदान करायचं असतं म्हणून केलं. आता काय व्हायचं ते हुईल.’
नवे पोलीस फोर्स
जिल्ह्यात नांदे्र, पलूस, अमणापूर, शिरढोण, कवठेमहांकाळ, चिंचणी या ठिकाणी वेगवेगळे पोलीस फोर्स दिसून आले. इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) व पंजाब बॉर्डर विंगचे जवान या ठिकाणी तैनात केले होते. आयटीबीपीचे शंभर, तर पंजाब बॉर्डर विंगचे जवळपास साडे पाचशे जवान तैनात असल्याचे पथकातील जवानांनी सांगितले.
अंदाज घेणे मुश्किल
अनेक तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय तज्ज्ञांनाही निकालाबाबतचा अंदाज घेणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे मतदानानंतर रात्री सर्वत्र निकालांविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या.

लॅपटॉप गेला अन मोबाईल आला...
लोकसभा निवडणुकीवेळी सांगली जिल्ह्यात बहुतांश बुथवर लॅपटॉपवरून मतदार याद्यांवर नावांचा शोध घेतला जात होता. सांगली शहरात असे चित्र अधिक दिसून आले होते. या सहा महिन्यातच हे चित्र बदलून लॅपटॉपची जागा आता स्मार्ट फोनने घेतली आहे. स्मार्ट फोनवर इंटरनेटच्या माध्यमातून ‘वोटर्स सर्च इंजिन’वर मतदारांच्या नावांचा शोध घेतला जात होता. सांगली शहरातील बहुतांश बुथवर हे चित्र होते. सांगलीतील खणभाग परिसरात अनेक बुथवर कार्यकर्ते मोबाईलवरून मतदारांना त्यांच्या अनुक्रमांकाची, केंद्र क्रमांकाची माहिती देत होते. भिलवडी व परिसरातील काही बुथवर मात्र लॅपटॉप दिसून आला. काही ठिकाणी छापील याद्यांमधूनच जुन्या पद्धतीने मतदारांना माहिती दिली जात होती.

Web Title: Parrot chat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.